लोकसत्ता टीम
नागपूर: एका बेरोजगार युवकाने नागपूर रेल्वे स्थानकावर आंबे विक्रीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. त्याला दंड तर भरावे लागलेच पण रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) त्याला अपमानित केले आणि त्यांच्याकडील आंबे देखील खावून संपवले.
नारी, पावरग्रीड चौक येथे राहणारा अंकेशकुमार राजनारायण बैस (३३) हा टॅक्सी चालविण्याचे काम करीत होता. काम सुटल्याने तो बेरोजगार झाला. हाताला काम नाही म्हणून तो रेल्वे स्थानकावर आंबे विकायला आला. बुधवारी सकाळी १०.३० वाजता तो फळे पेटीत घेऊन विक्रीसाठी आला. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येताच ग्राहकांच्या शोधात असलेल्या अंकेशला आरपीएफने विनापरवानगीने आंबे विकत असल्याने ताब्यात घेतले. आरपीएफने त्याला पकडून ठाण्यात आणले.
हेही वाचा… पकडायला गेले बोगस बियाणे अन् सापडला अवैध दारूसाठा, आरोपीला अटक करण्यासाठी वर्धा पोलीस गुजरातला रवाना
न्यायालयात हजर केले. त्याला दंड झाला. दंड भरून आल्यानंतर या युवकाने आरपीएफला सामान मागितले. दंड भरून आल्यानंतर या युवकाने आरपीएफ जवानांना आपले सामान परत मागितले. आरपीएफने सामान दिले, पण त्याच्या जेवणाच्या डब्याची पिशवी कचरापेटीत टाकली. तसेच त्याने विक्रीसाठी आणलेल्या आंब्यावर ताव मारला. ही आपबिती अंकेशकुमार राजनारायण बैस यांनी सांगितली. एवढेच नव्हे तर त्यासंदर्भातील त्याची तक्रार आरपीएफ किंवा लोहमार्ग पोलिसांनी घेण्यास नकार दिला, असेही तो म्हणाला.