चंद्रपूर : मातामहाकाली यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला असून, कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर त्यांनी स्वतः झरपट नदीची पाहणी केली. यात्रेकरूंच्या सुविधांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत विशेष बैठक घेतली आणि त्यांच्या समोर यात्रेकरूंना आवश्यक असलेल्या सुविधांसाठी आग्रही मागणी केली. या प्रयत्नांनंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासाठी चंद्रपूर भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झरपट नदीचे सौंदर्यीकरण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात निवेदनातून मागणी केली होती. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्याची दखल घेत पाठपुरावा केला. त्यानंतर माता महाकाली यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी यात्रेकरू कुठल्याही मुलभूत सुविधांपासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांनी विशेष निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष बैठकही घेतली. त्यानंतर चंद्रपूर शहरातील सोयीसुविधांसाठी २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासनादेश मंगळवार, ११ मार्चला निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये चंद्रपूर शहरातील पायाभूत सोयीसुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आ. मुनगंटीवार यांनी स्वतः झरपट नदीची पाहणी केली. प्राथमिक टप्प्यामध्ये नदी परिसरातील जलपर्णी वनस्पती काढुन नदीपात्रातील साफसफाई व स्वच्छता करावी. नदीपात्रात येणारे सांडपाणी बंद करावे. ३१ मार्चपर्यंत नदीचं पात्र स्वच्छ पाण्याने वाहते करावे. योग्य ठिकाणी गट्टू बसवावे. दोन टप्प्यांमध्ये काम करावे. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यातील कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. यासोबतच निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असा शब्दही दिला होता.

चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत असून, या यात्रेला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचे पवित्र तीर्थ म्हणून महत्त्व आहे, परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे. यातून गोंड राजवंशाचा इतिहास आणि वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. झरपट नदीच्या पुनरुज्जीवनातून गोंड राजवंशाचा गौरव अधोरेखित होईल, ही बाब आ. मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री यांना लक्षात आणून दिली. तात्काळ आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विषेश तरतूद योजनेअंतर्गत २ कोटी ९० लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे.

आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

आ. मुनगंटीवार यांनी यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी पाठपुरावा केला आणि त्याला यश आले आहे. आता भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सर्व कामे करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करून नागरिकांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

लाखो भाविकांना दिलासा

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाची दूरदृष्टी आणि प्रभावी निर्णयक्षमतेच्या बळावर नेहमीच जनतेच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा निधी मंजूर झाला असून, यातून यात्रेकरूंसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. हा निर्णय भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Story img Loader