बुलढाणा : बँक खात्याला आधारकार्ड लिंक करायचे आहे, असे सांगत बँक खात्याची माहिती घेवून ग्राहकाच्या खात्यातून तब्बल ४ लाख २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना खामगावात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात तोतयाविरोधात बुलढाणा सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
खामगाव शहरातील बाळापूर फैल भागातील रहिवासी अशोक ईटे यांना एका भामट्याने काही क्षणातच लाखोंचा फटका दिला. त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यावर बोलणाऱ्या तोतयाने तो बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी केली. “तुमच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक करायचे आहे,” असे सांगून त्याने इटे याना विश्वासात घेतले. त्यामुळे मागितलेली बँक खात्याची सर्व माहिती इटे यांनी दिली. त्यांनतर त्यांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख २५ हजार १६७ रुपये काढण्यात आल्याचे त्यांना कळाले.
हेही वाचा…नागपूर : आकाशी झेप घे रे…विमान प्रवासी संख्या २.२८ लाखांनी वाढली; पुणे, बंगळुरूकरिता विशेष विमाने
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक इटे यांनी बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत त्यांना कसे गंडविण्यात आले याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
फसवणुकीच्या घटनांत वाढ
दरम्यान, मागील काही महिन्यांत सायबर फसवणूक आणि गुन्ह्याचे प्रकार वाढले आहे. बँक अधिकारी बोलतोय, म्हणून सांगत बँकेचा सर्व तपशील घ्यायचा आणि काही मिनिटांतच भोळ्याभाबड्या ग्राहकाच्या वा व्यक्तीच्या खात्यातील रक्कम लंपास करायची, अशी युक्त भामट्यांनी अवलंबिली आहे. जिल्हा पोलीस विभाग, सायबर पोलीस आणि बँक प्रशासन यावर जनजागृती करते. तसेच सावध राहून कोणालाही बँक खात्याची कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन वारंवार केले जाते. तरीही नागरिक फसवणुकीला बळी पडत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात अद्भूत ‘किरणोत्सव’! स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अनोखा मिलाफ
सुशिक्षितही अडकताहेत भामट्यांच्या जाळ्यात
धक्कादायक बाब म्हणजे, या भामट्यांच्या जाळ्यात अशिक्षितांसह सुशिक्षितही मोठ्या प्रमाणात अडकू लागले आहे. सरकारी नोकरी करणारे, सेवानिवृत्त, व्यावसायिक, अशा अनेकांना या भामट्यांनी गंडवल्याचे प्रकार दररोज उघडकीस येत आहे. डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करणाऱ्यांवर या भामट्यांची विशेष नजर असते. बँक खात्याशी आधार कार्ड क्रमांक लिंक करायचा आहे, आपल्याला अमूक बक्षीस मिळाले आहे, बोनस पॉईंट, अशी विविध आमिषे दाखवून हे भामटे अनेकांना क्षणात गंडवतात. एटीएम कार्डचा वापर करणाऱ्यांच्या जमापुंजीवरही या भामट्यांचा डोळा असतो. आपले घामाचे पैसे या भामट्यांच्या खिशात जाऊ नये, यासाठी सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.