डॉ. विजयकुमार सारस्वत प्रमुख पाहुणे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराचा तरुण स्वयंसेवकांचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव उद्या गुरुवारी सकाळी ७.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या ‘निती’ आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत उपस्थित राहणार आहेत. डॉ. सारस्वत हे उच्च विद्याविभूषित तसेच संरक्षण संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. ग्वॉलियर, बंगळुरू आणि हैदराबाद येथे शिक्षण घेतलेले डॉ. सारस्वत डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या तालमीत तयार झाले आहेत. ते डीआरडीओ या संस्थेत उच्च पदावर कार्यरत होते. पृथ्वी, धनुष्य, प्रहार या क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
कार्यक्रमापूर्वी सकाळी ६.१५ मिनिटांनी गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन रेशीमबाग मैदानातून निघणार आहे. दोन पथके वेगवेगळ्या मार्गाने जाणार असून त्यात महाविद्यालयील व व्यावसायिक तरुणांचा समावेश राहणार आहे. रेशीमबाग चौक, गजानन चौक, जुनी शुक्रवारी, सोनबाजीची वाडी, सी.पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेज मार्गे रेशीमबागमध्ये, दुसरे पथक रेशीमबाग मैदानातून निघून सी.पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेज, राम कुलर चौक, अशोक चौक, सिरसपेठ, उमरेड मार्गाने रेशीमबागला परत येईल. यावेळी कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्हीएसके नागपूर डॉट ओआरजी’ या वेबसाईटवर बघता येणार आहे. शिवाय आरएसएस विजया दशमी या लिंकवर उपलब्ध राहणार आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर यावर्षी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सरसंघचालकांचे भाषण आणि कार्यक्रमाचा वृतांत वेबसाईटवर लोकांना पाहता येणार आहे. सर्व नागरिक आणि स्वयंसेवकांची वाहने ठेवण्याची व्यवस्था लोकांची शाळा, जामदार शाळा, सरस्वती मूकबधिर विद्यालयात करण्यात आली आहे. या विजयादशमी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पथसंचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करावे व कार्यक्रमाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर संघचालक राजेश लोया आणि महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा