मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असून दोन समुदायातील वादामुळे तेथे कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. तसेच अनेकदा जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, मणिपूरमधील या परिस्थितीबाबत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाष्य केलं आहे. मणिपूरमधील हिंसाचार थांबवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असे ते म्हणाले. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “RSS मोदींना पर्याय शोधतेय, त्यांनी जबरदस्तीने…”, राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “अमित शाह यांनी…”
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
गेल्या एका वर्षापासून मणिपूर शांतता प्रस्तापित होण्याची वाट बघतो आहे. त्यापूर्वी १० वर्ष मणिपूरमध्ये शांतता होती. तेथील गन कर्ल्चर संपुष्टात आलं, असं वाटत होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिथे अचानक हिंसाचार उफाळून आला किंवा उफाळून आणल्या गेला. तेव्हापासून आजपर्यंत मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या मुद्द्याकडे प्राथमिकतेने लक्ष्य द्यायला हवं. हे आपलं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेवरही केली टीप्पणी :
पुढे बोलताना त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवरही टीप्पणी केली. निवडणूक ही जनमत निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे. एखाद्या विषयांचे दोन्ही पैलू संसदेत मांडता यावे, यासाठीची ती व्यवस्था आहे. मात्र, आजकाल निवडणूक प्रचार खालच्या स्तराला गेला आहे. यादरम्यान एकमेकांनी शिविगाळ केली जात आहे, तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जातो आहे, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे योग्य नाही. आपल्याला निवडणुकीच्या उन्मादातून बाहेर पडत देशातील विविथ समस्यांचा विचार करावा लागेल. असे ते म्हणाले.