२०२४ च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची मोट बांधणं सुरू केलं आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर सूचक वक्तव्य केलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ते मंगळवारी (२४ ऑक्टोबर) दसऱ्याच्या निमित्ताने नागपूर संघ कार्यालयात आयोजित विजय दशमी सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, “आगामी काळ निवडणुकांचा आहे. पुढील काही दिवसांत काही राज्यांच्या निवडणुका होत आहेत. पुढे २०२४ ची लोकसभा निवडणूक आहे. लोकांना इकडून तिकडे नेण्यासाठी प्रचार सुरू होईल. भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न हिताचे नसले, तरी प्रचारात तसं अजूनही होत आहे. या गोष्टी टाळूया, कारण त्या समाजाच्या ऐक्याला धक्का लावतात.”
“मतदान करताना शांत डोक्याने विचार करा”
“लक्षात ठेवा, निवडणुकीत मतदान करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मात्र, मतदान छोट्या गोष्टींच्या आधारे करायचं नाही. शांत डोक्याने विचार करा की, कोण चांगलं आहे, कुणी चांगलं काम केलं आहे. भारताच्या जनतेकडे सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे यापैकी सर्वात चांगला कोण त्याला मतदान द्या,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
“राजकीय वर्चस्वाने हा प्रश्न सुटेल, असं म्हणणं कुचकामी”
मोहन भागवत पुढे म्हणाले, “एकमेकांविषयी जो अविश्वास आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्या देशात राजकारण स्पर्धेवर आधारित आहे. आपल्यामागे जास्त अनुयायी उभे रहावेत म्हणून समाजाची विभागणी केली जाते. दुर्दैवाने ही परंपराच झाली आहे. त्यामुळे राजकारणातून समाजातील अविश्वासाचं उत्तर सापडणार नाही. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून हा प्रश्न सुटेल, असं म्हणणं कुचकामी आहे.”
“आम्ही कुणाला शरण जातोय, असं मानण्याचं काही कारण नाही”
“आपल्याकडे लोकशाही आहे आणि इथं सर्व लोक सारखेच आहेत. कुणी उच्च नीच नाही. या पद्धतीनुसारच आपल्याला वागावं लागेल. मात्र, समाजाच्या एकतेसाठी आपल्याला राजकारणापासून वेगळं होऊन सर्व समाजाचा विचार करत मार्गक्रमण करावं लागेल. असं करत आम्ही कुणाला शरण जातोय, युद्ध सुरू होतं आणि आता युद्धबंदी झाली, असं मानण्याचं काही कारण नाही,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “डॉ. आंबेडकरांची ‘ती’ दोन भाषणं पारायण करण्यासारखी आहेत, वारंवार…”; मोहन भागवतांचं वक्तव्य
“प्रतिमा सुधारण्यासाठी केलेली ही कृती नाही”
“हे स्वार्थासाठी केलेलं आवाहन नाही किंवा कोणत्याही पक्षाचंही आवाहन नाही. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी केलेली ही कृती नाही. हे आपलेपणाचं आवाहन आहे. ज्यांना ऐकायला जाईल त्यांचं भलं होईल आणि जे यानंतरही ऐकणार नाहीत त्यांचं काय होईल, मला माहिती नाही,” असंही भागवत यांनी नमूद केलं.