Bangladeshi Hindus : नागपूर : बांगलादेशात असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणे एक देश म्हणून सरकारची जबाबदारी आहे, तेवढीच आपलीपण आहे. सरकार आपले काम करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे. देशात योग्य आणि शांततेचे वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी समाजाने आपल्या जीवनातील छोट्या-छोट्या समस्यांचे उपाय शोधले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, गेल्या काही दिवसात अराजकता पसरलेल्या बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणे एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. देशासाठी आजचा दिवस हा चिंतन करण्याचा आहे. पण फक्त केवळ चिंतन करून चालणार नाही. १८५७ पासून हा संघर्ष चालला आहे. त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळविले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नायकांची मोठी संख्या आहे. त्यात अहिंसक आंदोलनापासून क्रांतिकारकांचा समावेश आहे. हेच नायक देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढले. तर सामान्य नागरिकही तेव्हा देशासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाने त्यात वाटा उचलला होता.

हेही वाचा…लोकजागर: फुकाचा कळवळा!

देशासाठी बलिदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज, या कारणामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली, मात्र आजच्या पिढीवर स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. सरकारला शक्ती ही ज्यावेळी समाज त्या भावनेतून जगेल. देशाच्या सीमेवर सैनिक लढतात. त्यांच्या परिवाराची चिंता करणे, स्व काय आहे हे समजून आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्य मिळालेल्या देशासाठी जे मार्ग निवडले आहे, त्यावर चालणे आवश्यक आहे, त्यासाठी घटनात्मक नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. शेजारील देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे आणि तेथे राहणाऱ्या हिंदू बांधवांना आजही विनाकारण चटके सहन करावे लागत आहेत, त्यामुळे स्वसंरक्षण आणि स्वातंत्र्य हेच भारताचे प्राधान्य असून ही प्रत्येक देशाची जबाबदारी असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. प्रारंभी ध्वजारोहनानंतर भारत मातेची पूजा करण्यात आली. रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात संघाचे सरकार्यवाह दत्तात्र्य होसबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे प्रचारक राम वैद्य यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला संघाचे स्वयंसेवकही उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat emphasizes national responsibility and support for hindus in bangladesh on independence day vmb 67 psg