नागपूर : आयुर्वेद ही प्राचिन काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. परंतु, परकीय आक्रमणानंतर आयुर्वेदाचे महत्त्व घटले. आता मात्र या पद्धतीचा शुद्ध वापर व्हायला हवा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयुर्वेदिक व्यासपीठाच्या वतीने व भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय आयुर्वेद पर्व आणि आंतराष्ट्रीय परिषदेतील शनिवारी झालेल्या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयुष खात्याचे सचिव डॉ. राजेश कोटेचा व इतर उपस्थित होते. भागवत पुढे म्हणाले, इतिहास बघितला तर पूर्वी आयुर्वेद हे समाजाला मान्य होते. परंतु देशावर परकियांचे आक्रमण झाल्यावर ते मागे पडले.
आयुर्वेदातील ज्ञानाचा आता विस्तार व्हायला हवा. ही पद्धती स्वस्त, सुलभ व रुग्णांना फायद्याची आहे. इतरही पॅथी आहेत. त्याही चांगल्या आहेत. विविध पॅथीच्या लोकांमध्ये पॅथीचा विशेषतेतून अहंकार निर्माण झाला होता. या अहंकारावर भागवत यांनी एकच प्याला नाटकाचे उदाहरण दिले. त्यात दारुड्या पात्राची प्रकृती खालवते. त्याला बघायला एक वैद्य व दुसरा डॉक्टर असे दोघे येतात. एक मात्रा घेतल्यावर १५ मिनटात रुग्ण बरा होईल, असे वैद्य सांगतो तर दुसरा तो ५ मिनिटात मरेल असे सांगतो. दोघे हा रुग्ण किती वेळात मरणार यावर वाद घालताना दिसतात. असे न करता प्रत्यक्षात आयुर्वेदाचा शुद्ध वापर व्हायला हवा. त्यात इतर पॅथीची काही मदत घेता येईल का, यावर विचार शक्य आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मंचावर जयंत देवपुजारी, विलास जाधव, विनय वेलनकर, शिरीष पेंडसे, सूर्यकिरण वाघ उपस्थित होते.
हेही वाचा: बुलढाणा: उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेला पोलिसांची सशर्त परवानगी
विमा दावादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवा: प्रमोद सावंद
आयुर्वेद उपचारादरम्यान रुग्णांना विमा दावा मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. आयुष मंत्र्यांनी त्या सोडवण्याची गरज आहे. आयुर्वेदामुळे मी आमदार ते मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण आयुर्वेदाचे शिक्षण घेताना मी मानव धर्म, समाज कारणासह इतरही महत्वाच्या गोष्टी शिकलो. त्यामुळे आयुर्वेद क्षेत्रातील व्यक्ती काहीही करू शकतात, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.