केवळ एका पूजा पद्धतीचे नाव हिंदू नाही तर विविधता घेऊन आपण एकत्रितपणे जगू शकतो. हे जो जाणतो तोच हिंदू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारताला विश्वगुरू करायचे असेल तर सर्व समाजाने एकत्रित यावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट
नागपूर येथील रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समारोप समारभात गुरुवारी ते बोलत होते. यावेळी काशी महापीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी हे प्रमुख अतिथी होते. सरसंघचालक म्हणाले, हिंदू कोण याचे उत्तर जो भारतावर प्रेम करतो, भारतीय संस्कृतीचा अंगीकार करतो, त्याची खान-पान, पूजा पद्धती कुठलीही असो, पण जो भारत एक मानतो तो हिंदू आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीयांचा जागतिक स्थरावर आत्मविश्वास वाढला आहे. ‘जी २०’ शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही असामान्य बाब आहे. मात्र, ही सुरुवात आहे. अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. भारताला विश्वगुरू करायचे असेल तर संपूर्ण समाजाने एकत्रित यावे लागेल. भारत हा विश्वाला जोडणार महामार्ग असल्याचे अनेक देशांनी मान्य केले आहे.
हेही वाचा- कसा आहे समृध्दी महामार्गाचा आरंभ बिंदू?; एक किलोमीटर क्षेत्र, रांगोळीचा आकार आणि बरेच काही
भारताला आत्मनिर्भर बनवावे लागेल. जे प्रासंगिक आहे ते स्वीकार करावे लागेल, यातूनच भारत पुढे जाईल. पण नवीन भारताचे निर्माण करताना देशाचे मुलतत्व कायम ठेवावे लागेल, इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही. संघ सर्वांनाच स्वयंसेवक मानतो. काही आज आहे तर काही भविष्यात होतील. देशात भिन्नता असली तरी आपण एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजाने आपले काम करावे म्हणून संघ प्रयत्नशील आहे. समाज काम करेल तर संघाचे काम उरणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर वर्गाचे सर्वाधिकारी दक्षिणामूर्ती विदर्भ प्रांत सहसंचालक राम हरकरे, महानगर सहसंचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते.