नागपूर : आज देशात सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास होत आहे आणि भेदभाव करणाऱ्या घटकांकडून समाज तोडण्याचे खेळ सुरू आहेत. जात, भाषा, प्रदेशाचा वापर करत समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण केला जात आहे. त्यामुळे देशाच्या वायव्य सीमेला लागून असलेल्या पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख; सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तमिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे. जातीपातीच्या आधारावर कट्टरतावादाला चिथावणी देऊन निर्माण होत असलेले भेद व त्या माध्यमातून अराजकता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात सरसंघचालक बोलत होते. यंदा संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. त्यामुळे यंदाचा सोेहळा विशेष होता. कार्यक्रमाला इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशातील वाढत्या कट्टरतावादावर चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ होत आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि त्यांना विरोध करण्याचे लोकशाहीतील काही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, ही गुंडगिरी आहे. हे नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर विनाकारण दगडफेक आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती हे त्याचे उदाहरण आहे. अशा घटना घडू न देणे, घडल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण ठेवणे, हलगर्जी करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा करणे हे प्रशासनाचे काम आहे. पण, प्रशासन पोहोचेपर्यंत समाजालाच स्वत:चे, प्रियजनांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करावे लागते. त्यामुळे समाजानेही सदैव पूर्णपणे सजग राहून या वाईट प्रवृत्तींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना ओळखण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून हा देश एकसंध, सुखी, शांत, समृद्ध आणि सशक्त बनवणे ही प्रत्येकाची इच्छा आणि कर्तव्य आहे. यामध्ये हिंदू समाजाची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे समाजात विशिष्ट प्रकारची परिस्थिती, जनजागृती आणि विशिष्ट दिशेने संयुक्त प्रयत्नांची गरज आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर भर दिला.

हेही वाचा : नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले

महानगर संघचालक राजेश लोया यांनी प्रास्ताविक केले. विजयादशमीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

स्वार्थी राजकारणामुळे देशाचे नुकसान

लोकशाही देशात बहुपक्षीय शासन प्रणाली असते. पक्ष सत्ता मिळविण्यासाठी स्पर्धा करतात. परस्पर सद्भावनेपेक्षा किंवा राष्ट्राची एकता आणि अखंडता यापेक्षा समाजातील लहान हितसंबंध महत्त्वाचे ठरतात. पक्षांमधील स्पर्धेमध्ये समाजाची सद्भावना, राष्ट्राचा अभिमान आणि एकात्मता या गोष्टी दुय्यम मानल्या जातात. अशा पक्षीय राजकारणात एका पक्षाच्या समर्थनार्थ उभे राहून विनाशकारी धोरण पुढे नेले जाते. पर्यायी राजकारणाचा वापर करून देशातील विविधतेला तडा देण्याचे व फुटीरवाद तसेच असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये गुन्हेगारांना संरक्षण घृणास्पद

कोलकात्याच्या आर.जी. कार रुग्णालयात घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणारी आहे. अशा निंदनीय घटनेचा निषेध आणि त्वरित, संवेदनशील कारवाई करावी या मागणीसाठी संपूर्ण समाज वैद्याकीय क्षेत्रातील बांधवांच्या पाठीशी उभा राहिला. पण, एवढा भीषण गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले, अशा शब्दांत सरसंघचालकांनी पश्चिम बंगाल सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.

हेही वाचा : आमदार सुलभा खोडके काँग्रेसमधून निलंबित ; पक्षविरोधी कारवाया केल्‍याचा ठपका

बांगलादेशातील स्थिती गंभीर

●बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत तोपर्यंत हिंदूंसह अल्पसंख्याक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे.

●भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. भारताचा सामना करण्यासाठी तेथे पाकिस्तानशी हातमिळावणी करण्याच्या गोष्टी होत आहेत.

●जगातील काही देश हे प्रयत्न करत आहेत. यावर शासनाने लक्ष दिले पाहिजे. भारतातदेखील अवैध घुसखोरी सुरू असून त्यामुळे लोकसंख्येचे असुंतलन निर्माण होत आहे. ही गंभीर बाब आहे, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.

‘ओटीटी’ला कायद्याच्या चौकटीत आणा

आजच्या युगात मुले काय पाहत आहेत याकडे पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा सभ्यतेचे उल्लंघन होते व विकृती वाढते. त्यामुळे मोबाइलच्या वापरावर लक्ष ठेवायला हवे. ओटीटी माध्यमावर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टी हा चिंतेचा विषय असून या माध्यमाला कायद्याच्या चौकटीत आणले गेले पाहिजेे, अशी अपेेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.