गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमधील परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण झाल्याचं दिसत आहे. तीन महिन्यांपूर्वी दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या प्रकरणावरून तिथल्या परिस्थितीचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला. थेट देशाच्या संसदेपर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मणिपूरमधील कुकी व मैतेई समाजांमध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. काही दिवसांपासून मणिपूरमधील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरमधील स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे.
नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा आयोजित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. देशाच्या एकतेबाबत बोलताना मोहन भागवत यांनी मणिपूरमधील अशांत स्थितीवरही भाष्य केलं.
काय म्हणाले मोहन भागवत?
यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरमधील अशांत परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल, यावर आपलं मतप्रदर्शन केलं. “मणिपूर सध्या शांत होत आहे. पण आपापसांत हा वाद कसा झाला? गेल्या अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहात होते. अचानक वाद कसा झाला? ते भारताचं सीमेवरचं राज्य आहे. तिथे असे वाद होणं यात कुणाचा फायदा आहे? बाहेरच्या शक्तींचाही फायदा आहे. बाहेरचेच लोक होते का हे सगळं करणारे?” असा प्रश्न मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे.
“केंद्र सरकार मजबूत आहे आणि तत्परही आहे. खुद्द गृहमंत्री तिथे तीन दिवस जाऊन राहिले. सर्व प्रयत्न केले. देशाचं सरकार तिथे शांततेसाठी कटिबद्ध आहे. पण तरीही वाद चालू राहिले. कारण शांतीचा प्रयत्न चालू असतानाच कुठलातरी वाद निर्माण केला जात होता. ही हिंसा भडकवणारे लोक कोण होते? हे होत नाहीये, हे केलं जात आहे. त्यामुळे खूप सारं काम करावं लागेल”, असंही मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.
मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय करावं?
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसणाऱ्या मणिपूरला शांत करण्यासाठी नेमकं काय करता येईल? यावर मोहन भागवत यांनी भूमिका मांडली आहे. “तिथे लोकांची मनं दुखावली आहेत. फक्त शांती नाही, आता समाजाला जोडण्याचंही काम करावं लागेल. संघाचे स्वयंसेवक आधीही तेच करत होते, आजही तेच करत आहेत. अशा स्थितीतही समाजात फूट निर्माण होऊ नये, यासाठी तिथे जिवावर उदार होऊन काम करत आहेत. मणिपूरमध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. पण तिथे सगळ्यांना काम करावं लागेल. सरकारची इच्छाशक्ती तर आहेच. पण त्याचबरोबर प्रशासनाच्या कृतीशीलतेचीही गरज आहे. अविश्वास कमी करण्यासाठी तिथल्या नेतृत्वालाही काम करावं लागेल”, असं मोहन भागवत म्हणाले.
“अशा घटनांचं उत्तर एकच आहे. परस्पर टीका-टिप्पणी न करता आपल्याला एकतेच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. प्रत्येक परिस्थितीत एकतेचं भान समाजाला जागृत ठेवतं. राज्यघटनेत याच एकात्मतेला मार्गदर्शक तत्वाच्या रुपात नमूद केलं आहे”, असंही ते म्हणाले.