नागपूर: टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाचे दुःख सर्वांनाच झाले असून अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. रतन टाटा यांचे साधन पण आणि मोठेपणा एकदा नागपूरकरांनी अनुभवलेला आहे. ७९ व्या वाढदिवशी सेलिब्रेशन करण्याऐवजी टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले होते व तेथे त्यांनी विदर्भातील विविध सेवाकार्यांची माहिती जाणून घेतली होती. रतन टाटा यांच्या निधनानंतर पुन्हा या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटांसाठी संघाचे ‘रेड कार्पेट’

२८ डिसेंबर २०१८ रोजी बुधवारी रतन टाटा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे २० मिनिटे चर्चा केली. संघ मुख्यालयात देशातील मोठ्या असामींची वर्दळ असतेच. मात्र कुणालाही संघातर्फे विशेष वागणूक दिली जात नाही. मात्र रतन टाटांसाठी मात्र संघाने अक्षरश: ‘रेड कार्पेट’च अंथरले होते. विमानतळावरील त्यांच्या आगमनापासून अखेरपर्यंत संघ पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. नागपूर विमानतळावर देखील त्यांचे स्वागत करण्यात आले होते.

हे ही वाचा…नागपूर : अंबाझरी पूल सुरू होणार, काउंट डाऊन सुरु

स्मृती मंदिराचे दर्शन

रतन टाटा अचानक नागपुरात दाखल झाले व ते विमानतळाच्या बाहेर निघाल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी रेशीमबाग येथे जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले होते. संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी यावेळी प्रदर्शित केली होती. या भेटीनंतरच चंद्रपूर जिल्ह्यातील अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत टाटा ट्रस्टने सामंजस्य करार केला होता.

हे ही वाचा…लोकजागर: वादाची ‘कविता’!

भारताने अमूल्य रत्न गमावले

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन तमाम भारतीयांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने भारताने एक अमूल्य रत्न गमावले आहे. भारताच्या विकास प्रवासात रतन टाटा यांचे योगदान अविस्मरणीय राहील. नवीन आणि प्रभावी उपक्रमांसोबतच त्यांनी उद्योगातील महत्त्वाच्या क्षेत्रात अनेक उत्कृष्ट मानके प्रस्थापित केली. समाजाच्या हितासाठी सर्व प्रकारच्या कामात त्यांचे सततचे सहकार्य व सहभाग कायम राहिला. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेचा मुद्दा असो किंवा विकासाचा कोणताही पैलू असो किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांचे कल्याण असो, रतनजी त्यांच्या अद्वितीय विचार आणि कार्याने प्रेरणादायी राहिले. अनेक उंची गाठल्यानंतरही त्यांची साधेपणा आणि नम्रता ही शैली अनुकरणीय राहील. त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्ही आमचे विनम्र अभिवादन आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. – डॉ.मोहन भागवत, सरसंघचालक.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat tribute to ratan tata dag 87 sud 02