लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रीय स्वयंवेक संघाच्या स्थापनेपासून संघ विस्ताराची माहिती देत संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सर्वच आमदारांनी सक्रियतेने सहभागी होऊन काम करावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भाजपसह शिंदे गटाचे बहुतांश आमदार यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले या दोन आमदारांनी यावेळी उपस्थिती दर्शविली, मात्र अजितदादांसह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते यांनी संघाच्या निमंत्रणापासून फारकतच घेतली.

आणखी वाचा-‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अमित शहांच्या वादग्रस्त मुद्यावर विरोधक संतप्त

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरावपंत हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर स्मृतीभवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात संघाचे विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे यांनी सर्व आमदारांना बौद्धीक देताना संघ कार्याचा विस्तार कशा पद्धतीने झाला. त्याकाळात प्रचारकांनी कुठल्या परिस्थितीत काम केले आणि संघाच्या शाखा विस्तार केला याची माहिती दिली. देशकार्यासाठी संघ नेहमीच काम करत असताना आपणही संघाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-राजभवनातील शपथविधी सोहळा ‘त्या’ च्या साठी ठरला जीवघेणा..

संघाचे शताब्दी वर्ष सुरू असून संघाकडून सगळीकडे विविध उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमात आपला सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संघाच्या स्थापनेपासून संघाची वाटचाल आणि वाढ कशी झाली. त्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी कशा पद्धतीने काम केले याबाबत माहिती देत काही प्रचारकांची माहिती दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व आमदारांनी शताब्दी वर्षानिमित्त सुरू केल्या जाणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी व्हावे असे अपेक्षा संघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अनेक आमदारांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी व्यासपीठावर संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. संघाच्या मार्गदर्शनानंतर पहिल्यांदा आलेल्या आमदारांनी संघ परिसराची पाहणी केली.

Story img Loader