लोकसत्ता ऑनलाइन, वर्धा
ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपामधील नवे जुने हा वाद उफाळून आला असून आमदार डॉ. पंकज भोयर यांना प्रतिकुल तर त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना राजकीय स्थिती अनुकुल असल्याचा अहवाल थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे ‘व्हायरल’ झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संघाच्या वर्धा शाखेने व भाजपाच्या मिडिया सेलने या प्रकरणी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करीत आरोपींचा त्वरीत छडा लावण्याची विनंती केली.
संघाच्या दिल्लीस्थित केशवकुंज कार्यालयाच्या लेटरहेडवरील एक अहवाल आज दुपारपासून समाजमाध्यमातून प्रसारित झाला. त्यात वर्धा मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर तसेच इच्छूक अतुल तराळे, सुरेश वाघमारे व डॉ. सचिन पावडे यांना मतदारांची जाती व धर्मनिहाय पसंती दाखविण्यात आली आहे. तराळे ३१ टक्के, वाघमारे ३३ टक्के, भोयर २० टक्के तर पावडे १४ टक्के लोकांच्या पसंतीस उतरल्याचे या अहवालातून दर्शविण्यात आले आहे. भो.र यांचे तिकिट कापून त्यांच्या ऐवजी अन्य इच्छूकास तिकिट देण्याचा संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होते. दुपारपासून हा संदेश व्हॉट्सअॅपवर गतीने प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली.
त्याची त्वरीत दखल घेत भाजपाच्या मिडिया सेलचे जिल्हा संयोजक श्रीनिवास मोहता यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. २० सप्टेंबर ही तारीख नमूद असलेला आंतरिक सर्वेक्षणाचा हा अहवाल पूर्णपणे खोटा बनावट असून असे कुठलेही सर्वेक्षण झालेले नाही. संदेश पाठविणाऱ्या मोबाइल धारकाशी वारंवार प्रयत्न करण्यात आला. परंतू प्रतिसाद मिळाला नाही.
मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा मजकुर प्रसारित करण्यात आला असून संघ असे जातीनिहाय सर्वेक्षण कधीच करीत नाही. निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हा मोठा गुन्हा असून याची त्वरीत सखोल चौकशी करावी. जातीधर्मात तेढ निर्माण करणे व माहिती तंत्रज्ञान कायदय़ाअंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशी तक्रार भाजपाने केली आहे. तसेच रा.स्व. संघाचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांनीही याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार करीत सर्वेक्षणाशी संघटनेचा कुठलाही संबंध नसल्याचे नमूद केले.
यासोबत ज्या मोबाईल क्रमांकावरून संदेश आले ते क्रमांक तक्रारीत दाखल करण्यात आले आहे. मात्र या अशा प्रकरणामूळे जून्या व नव्या भाजपा नेत्यांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा चांगलीच उसळली. माजी खासदार असलेल्या सुरेश वाघमारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र दुसरे कथित इच्छूक व वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय असून संघाला यात गोवल्याने व्यथित झाल्याचे मत व्यक्त केले.