नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांने संघाची व्याप्ती,कार्यक्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. विविध क्षेत्रातील, प्रवाहातील, संवर्गातील नागरिकांना संघाशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कार वॉशिंग व्यावसायिकांचा विशेष वर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगर शाखेतर्फे रविवारी २ जूनला रेशीमबाग नागपूरमध्ये आयोजित केला आहे. यात या व्यावसायिकांना संघ समजावून सांगण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला जातो. परंतु, यावर्षीपासून मात्र संघाकडून तृतीय संघ शिक्षा वर्ग या नावाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग -२ असे नाव देण्यात आले आहे रेशीमबाग नागपूर येथे १७ मेपासून कार्यकर्ता वर्ग सुरू आहे. यासाठी देशभरातील स्वयंसेवक नागपुरात आले आहे.संघाच्या संघटनात्मक बांधणीत प्रशिक्षण वर्गांना फार महत्त्व आहे. संघकार्य प्रत्यक्ष पाहणे आणि समझने तसेच संघाची कार्यपद्धती लोकांना कळावी या प्रक्रियेत दर वर्षी समाजातील विविध घटकांना निमंत्रित करून त्याना संघ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा कार वॉशिंग व्यावसायिकांना बोलावण्यात आले आहे.रविवारी २ जूनला सायंकाळी ६ वाजता त्याना संघ, आणि संघाची कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे, असे नागपूर महानगर संघचालक कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
हेही वाचा…लोकजागर : निवडणूक आख्यान – चार
नागपूर महानगरात कार वॉशिंग हा व्यवसाय मोठ्याप्रमाणात फोफावला असून यात बहुतांश युवक वर्ग काम करतो. शहराच्या विविध भागातील बंगले,निवासी गाळे, निवासी संकुलामध्ये जाऊन ही मंडळी कार स्वच्छ करतात. या व्यवसायामुळे या युवकांचा समाजातील सर्व घटकांशी संपर्क येतो. याच कारणामुळे संघाकडून वरील व्यावसायिकांना निमंत्रित केल्याची माहिती आहे.
दरम्यान संघ शिक्षा वर्गात दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्याचे एकत्रीकरण कार्यक्रम आयोजित केला जातो.यावर्षी कार वॉशिंग आणि वाहन दुरुस्ती क्षेत्रात जे काम करत असतील अशा कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण शिबीर होणार आहे. त्यांना संघ आणि संघ शिक्षा वर्गाला बद्दल माहिती दिली जाईल आणि त्यांचे समाजात असलेले स्थान याबाबतही संघाचे पदाधिकारी व काही तज्ञ मार्गदर्शन करतील, असे संघाचे गौरव जाजू यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गाला १९२७ मध्ये सुरूवात झाली पहिल्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन मोहिते वाडा येथे करण्यात आले होते. चाळीस दिवसांच्या त्या वर्गात एकूण १७ शिक्षार्थीं होते. तेव्हापासून तृतीय संघ शिक्षा वर्ग म्हणून या वर्गाची ओळख होती. या वर्गात पूर्वीच्या सर्व वर्गांचे प्रशिक्षण घेतलेले देशभरातील स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. प्राथमिक शिक्षण वर्ग विविध प्रांतात होतात.मात्र तृतीय वर्ष वर्ग केवळ नागपुरातच आयोजित केला जातो. या वर्गानंतरच स्वयंसेवकांना संघाची जबाबदारी दिली जाते. या वर्षीपासून स्वयंसेवकांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जात आहे.