नागपूर: हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघपरिचय वर्गाचे आयोजन केले जाते. यावेळी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे सर्व आमदार हे रेशीमबागेतील स्मृति मंदिर स्थळी जाऊन पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतात. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्यावर महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर २०२३ मध्ये नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संघाकडून परिचय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी संघ दरबारी जाणे टाळले होते. यावर्षी संघाने १९ डिसेंबरला सकाळी आठ वाजता महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे अजित पवार यावेळी रेशीम बागला जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याआधीही नागपुरात जाऊनही अजितदादांनी दोनदा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयात जाणं टाळले होते. पण आता ते महायुतीत चांगलेच रुळले आहेत. तसेच त्यांचे ४१ आमदार निवडून येण्यात भाजपसह संघाचंही योगदान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की संघाचे निमंत्रण स्वीकारणार याकडे लक्ष लागलेलं आहे.
आमची शाहू, फुले आणि आंबेडकर ही विचारधारा आम्ही सोडणार नाही म्हणत महायुतीत दाखल होऊनही अजित पवार आणि त्यांचे आमदार सरकारमध्ये सुरुवातीला थोडे फटकूनच वागत होते. त्यात फडणवीसांनीदेखील अजितदादांशी आमची असलेली युती नैसर्गिक नसून राजकीय असल्याचे म्हणत महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘अवघडलेपण’ अधोरेखित केले होते. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झालेल्या महायुतीच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भेटीचे निमंत्रण पाठवले आहे. पण आता यात अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस संघाच्या कार्यालयात जाणार की संघाचं निमंत्रण धुडकावणार याकडं सर्वांचेचं लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा – झाडाच्या फांद्या तोडण्यास परवानगीची गरज नाही; विधानसभेत विविध विधेयके सादर
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अखेर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपुरात पार पडला. यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. अनेक इच्छुक आणि शर्यतीत असलेल्या आमदारांना मंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याने तीव्र नाराजी आहे. यातच नागपुरातून मोठी माहिती समोर आली आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाकडून महायुतीच्या सर्व आमदारांना येत्या १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणानुसार महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे आमदार यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार संघ कार्यालयात जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.