नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र आज सावरकरांचे योगदान नाकारत काही लोक त्यांच्यावर टीका करतात. अशा टीका करणाऱ्यांच्या कुटुंबातील किती पूर्वज फाशीवर चढले, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रसार प्रमुख सुनील आंबेकर यांनी राहुल गांधी यांचे नाव घेता केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्व संवाद केंद्रातर्फे मंगळवारी आयोजित देवर्षि नारद सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होेते.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत, विश्व संवाद केंद्राचे प्रमुख अतुल पिंगळे उपस्थित होते. यावेळी सुनील आंबेकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी यातना सहन केल्या.  मात्र आज जे सावरकरांवर टीका करतात त्यांना सावरकरांबाबत माहितीच नाही.

हेही वाचा >>> राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणतात, फडणवीस यांच्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटत आहे, दिल्लीच्या आशिर्वादाशिवाय…

परिस्थितीमुळे पत्रकारिता प्रभावित होता कामा नये, हे नारद मुनींच्या चारित्र्याचे सार आहे. यासाठी विचारांची बैठक मजबूत हवी. एखादी व्यक्ती सत्याच्या मार्गाने जाताना संपूर्ण समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.  परिवर्तनाची सुरुवात समाजातून होते. पत्रकारिता, समाजमाध्यम हे परिवर्तनाचे माध्यम आहे. हे माध्यम सत्याला धरून रहावे यासाठी समाजाने जागरूक राहणे गरजेचे असल्याचेही आंबेकर म्हणाले. 

जे सत्य आहे तेच बोलायला हवे- रुबिका लियाकत

रुबिका लियाकत म्हणाल्या, सत्य सुंदर असो वा नसो ते आपल्याला स्वीकारावेच लागेल. पत्रकारितेत ‘ग्रे एरिया’ असे काही नसते. एकतर सत्य असते अथवा असत्य असते. देशहिताची, अत्याचार विरोधाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा तटस्थ राहणे शक्यच नाही. एक कुठली तरी एक बाजू आपल्याला घ्यावीच लागते. आज आपण सत्य बोललो नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय उत्तर देणार? त्यामुळे जे सत्य आहे तेच बोलून असत्य समूळ खोडावे लागेल, असा संदेश त्यांनी दिला.

उज्ज्वल भविष्याच्या दिशेने’ या पुस्तकाचे प्रकाशन रुबिका लियाकत यांच्या हस्ते

या कार्यक्रमात पत्रकार संजय रामगिरवार, रजत वशिष्ठ, छायाचित्रकार विशाल महाकाळकर, समाज माध्यम इन्फ्लूएन्सर्स विभागातून निखिल चांदवाणी व सिटीझन जर्नालिस्ट विभागातून डॉ. लखेश्वर चंद्रवंशी यांचा  पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रसाद बर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनिल आंबेकर लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने’ या पुस्तकाचे प्रकाशन रुबिका लियाकत यांच्या हस्ते करण्यात आले. राधा ठेंगडी यांनी गीत सादर केले. ब्रजेश मानस यांनी आभार मानले.