लोकसत्ता टीम
चंद्रपूर : अमृत पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या कामांसाठी शहरातील सिमेंट व डांबरी रस्ते फोडण्यात आले. यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सोबतच धुळीचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. या खड्डे आणि धुळीचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांवरून महापालिका आयुक्त, स्थानिक आमदार, खासदार, आजी-माजी पालकमंत्र्यांनी दुचाकीने शहरात फेरफटका मारावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संदीप पोशट्टीवार यांनी दिले आहे. त्यांनी थेट समाज माध्यमावर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे कान टोचल्याने चर्चेला उधाण आले असून शहराच्या दुर्देशेबद्दल प्रचंड संतापही व्यक्त होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत ‘प्रशासक राज’ आहे. असे असतानाही गेल्या दोन वर्षांत शहरात कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत. शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांची कामे करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेकडून अमृत पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजनांसाठी सिमेंट व डांबरी रस्ते फोडण्यात आले. रस्ते फोडून तेथून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ज्या भागातील काम पूर्ण झाले तेथील खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शहरात सर्वत्र मोठमोठे खड्डे दिसत आहेत. यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी या दोन मार्गांवर खड्डेच खड्डे असल्याने तेथून दुचाकी चालवणेही कठीण झाले आहे. धुळीमुळे अनेकांना श्वसन आणि हृदयाशी संबंधित त्रास उद्भवतो आहे.
ही समस्या दूर करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, आजी-माजी पालकमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. शहराची ही बकाल अवस्था पाहून संघाचे स्वयंसेवक तथा गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य पोशट्टीवार यांनी या सर्वांना दुचाकीने शहराचा फेरफटका मारून दाखवा, असे आवाहन दिले आहे. नियोजनशून्य कारभारातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. जनता त्रस्त, तर कंत्राटदार आणि त्यांच्याकडून टक्केवारी घेणारे अधिकारी मस्त, अशी स्थिती सध्या चंद्रपुरात आहे, अशी टीका समाज माध्यमावर केली जात आहे.
‘रस्त्यांची कामे पूर्ण करा’
वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रमुख मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंजूर २० कोटी रुपयांच्या निधीतून त्वरित रस्त्यांच्या कामांना सुरुवात करा, असे निर्देश दिले. रस्त्यांची तातडीने पुनर्बांधणी सुरू करावी. चैत्र नवरात्र यात्रेपूर्वी जटपूरा गेट हा प्रमुख मार्ग पूर्णतः तयार करा, असे निर्देशही त्यांनी दिले. गांधी चौक ते पठाणपुरा, आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट, यांसह इतर दोन प्रमुख मार्गांचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.