अमरावती : खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश सुविधा देणारी आरटीईची प्रवेशप्रक्रिया यंदा १८ डिसेंबरला शाळा नोंदणीपासून सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल. तर, मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे नियमित वेळेत आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ शकतील.
बालकांच्या मोफत शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या राखीव ठेवल्या जातात. या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीला सुरुवात करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून-जुलै महिन्यातच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे, शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
हेही वाचा – उपराजधानी गारठली अन् राजकीय वातावरण तापले; हिवाळी अधिवेशनाआधी…
एकीकडे डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी आरटीई प्रवेशप्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्वतयारी कार्यशाळा १५ जानेवारीऐवजी आता १५ डिसेंबरलाच घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी १० एप्रिलवरून आता १० मार्च करण्यात आला आहे.
२०२४-२५ मधील शैक्षणिक वर्षांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया प्रथम चुकीच्या निर्णयामुळे, त्यानंतर न्यायालयीन प्रकरणांमुळे आणि पुनप्रक्रियेमुळे लांबली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळांनाही आधीच या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याचे काम केले. विद्यार्थी पालकांचे नुकसान झाले. याची दखल घेत किमान यंदा तरी आरटीई प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू करावी, अशी मागणी होती.
गेल्यावर्षी अमरावती जिल्ह्यातील २३२ शाळा या प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या, २३९६ जागांसाठी ६ हजार ६२६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २३०० विद्यार्थ्यांची सोडत निघाली. त्यापैकी १५१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. उर्वरित जागा रिक्त राहिल्या होत्या. आता एक महिना अगोदर ही प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून शाळांना नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे.