अमरावती : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी व विक्रीप्रकरणी अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासानंतर हा गैरकारभार उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध राज्यांतून चोरण्यात आलेले ट्रक, ट्रेलरच्या चेसिस व इंजिन क्रमांकात फेरबदल करून व त्यांची परराज्यात नोंदणी करून विक्री केली जात होती. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण ५ कोटी ५० लाख रुपये किमतीची २९ वाहने जप्त केली आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय‍क परिवहन अधिकारी भाग्‍यश्री पाटील (४३), मोटार निरीक्षक गणेश वरूठे (३५) आणि सहायक मोटार निरीक्षक सिद्धार्थ ठोके (३५) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या अधिकाऱ्यांची नावे आहेत. नोंदणीसाठी आलेल्‍या वाहनांची प्रत्‍यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्‍या वाहनांची नोंदणी करणे या अधिकाऱ्यांना भोवले.

हेही वाचा…अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून ‘सायबर फ्रॉड’, नागरिकांकडे पैशांची मागणी

आरोपी वाहनांच्‍या चेसिस व इंजिन क्रमांकात फेरबदल करून त्यांची अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यात नोंदणी करत होते. त्यानंतर ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच वाहनांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून त्यांची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत फेरनोंदणी करून लाखो रुपयांमध्ये विक्री करत होते. गेल्‍या मार्च महिन्यामध्ये अशाप्रकारे बनावट नोंदणी करून विकलेले दोन ट्रक नवी मुंबईच्‍या कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत आले असता नवी मुंबई पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले.

हेही वाचा…आमदाराच्या कुटुंबीयाच्या कारला भीषण अपघात….चिमुकलीसह सहा ठार….

अमरावतीच्‍या अधिकाऱ्यांनी आरोपींशी संगनमत करून वाहने समक्ष हजर नसताना त्यांची फेरनोंदणी केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी नागपूर येथील आरटीओ कार्यालयातील दलालाला देखील अटक केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto corruption exposed three officials arrested for registering stolen trucks with forged documents mma 73 psg