अमरावती : नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतील रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पातील राखेची रात्रंदिवस अनेक डंपरच्या माध्यमातून नियमबाह्य वाहतूक होते. अशाच एका वाहनामुळे गेल्या मंगळवारी अपघात घडला. अपघातानंतर राखेच्या वाहनांवर कारवाईची मागणी विविध पक्ष, संघटनांनी केली होती. अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेतली. रतन इंडिया औष्णिक उर्जा वीज प्रकल्पातून राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ११ वाहनांना २ लाख २५ हजाराचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकारण्यात आला.
गेल्या दोन दिवसापासून विशेष तपासणी मोहीम अंतर्गत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या अकरा वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक निलेश दहेकर, पल्लवी दौंड , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश गावंडे, शिवशंकर कातडे, कांचन जाधव, निलेश जाधव, वाहन चालक मोहम्मद अतहर, बलराज बोंडवले, अमित पाल व पंकज कोवे यांनी ही कारवाई केली. गेल्या पाच महिन्यांत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून राखेची वाहतूक करणाऱ्या ५४ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून १९ लाख ९० हजार पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
गेल्या मंगळवारी अनियंत्रित हार्वेस्टरने नांदगावपेठ येथे एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती, त्यात ऋषिकेश निंभोरकर (२८, रा. नांदुरा) हा युवक ठार झाला होता. ऋषिकेश हा नांदगावपेठ येथून नांदुरा येथे जात असताना विरूद्ध दिशेने येत असलेल्या हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात भरधाव वाहनातील राख उडाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ऋषिकेशच्या दुचाकीला अनियंत्रित हार्वेस्टरने जबर धडक दिली होती. या अपघातात ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ऋषिकेशच्या कुटुंबीयांनी शवागृहासमोर आक्रोश करीत राख वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी रेटून धरली आणि मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. राख वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे यापुर्वीही अपघात घडले असल्याने तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षासह विविध संघटनांनी केली होती.