चंद्रपूर : गेल्या पंधरा महिन्यांपासून बैठक न झाल्याने खनिज विकास निधीचा ८०० कोटींचा विकास निधी पडून आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: काही कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. मात्र तरीही झरपट नदी विकासासह इतर अनेक कामे प्रलंबिल आहेत. कामाख्या देवी व माता महाकाली अशा दोन मातांचे दर्शन घेणारा सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी शक्ती कमी पडत असल्याची स्पष्ट कबुली आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
महाकाली महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत आमदार किशोर जोरगेवार यांनी विकास कामांसाठी आमदारांशी शक्ती कमी पडते असे सांगितले. खनिज विकास निधी बऱ्याच महिन्यांपासून तसाच पडून आहे. खनिज विकासाची बैठक लावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु पंधरा महिने झाले ही बैठक झालेली नाही. त्याचा परिणाम ८०० कोटींचा विकास निधी पडून आहे. या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जावू शकतात असेही ते म्हणाले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही विकास कामांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे असेही जोरगेवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> गडचिरोली : भाजप आमदाराचे आपल्याच क्षेत्रात रास्तारोको…
मंत्र्यांची कामे होतात असेही आमदार जोरगेवार म्हणाले. खनिज विकासाचा निधी अक्षरश: पडून आहे. या निधीतून झरपट नदीवर पाणी शुध्दीकरण प्लान्ट लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रीत केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून त्यांनाही निमंत्रीत करणार असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी दिली. शहरातील मुख्य रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी मिळाला. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.