यवतमाळ : सलग १३ तास सातत्याने धावण्याच्या विक्रमाची सुरुवात मंगळवारी सकाळी ७ वाजता यवतमाळच्या नेहरू स्टेडियमवर झाली. ‘धरू व्यायामाची कास, करू व्यसनांचा ऱ्हास’ हा संदेश देत जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय धावपटू देव पंचफुला श्रीरंग चौधरी हा ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये आपले नाव नोंदवणार आहे.
‘आम्ही यवतमाळकर क्रीडाप्रेमी’च्यावतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, सामाजिक क्षेत्रातील डॉ. प्रकाश नंदुरकर, डॉ. विजय कावलकर, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदींनी देव याला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी, व्यायामाची सुरुवात करताना सामान्य माणस उद्या करू म्हणून चालढकल करतो. मात्र व्यायामाची गरज ज्यांनी ओळखली ते उद्याला कधीच महत्व देत नाही. ते कायम वर्तमानावर विश्वास ठेवून आपले लक्ष्य साध्य करतात, असे सांगितले. देव याने सकाळी ७ वाजता धावण्यास सुरूवात केली. सकाळी सव्वाआठ वाजेपर्यंत त्याने ४०० मिटर धावपट्टीवर ४० राऊंड पूर्ण केले होते. यावेळी देवसोबत यवतमाळकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. देव रात्री ८ वाजेपर्यंत सलग १३ तास धावणार आहे. या विक्रमात तो जवळपास १५० किमी धावणार आहे.
पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील देव चौधरी याने देश, विदेशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केले. धावणारा देव अशी त्याची ओळख आता सर्वत्र झाली आहे. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन सिटीत ‘द अल्टिमेट ह्यूमन रेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्वांत खडतर अशा या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये देव धावला आणि ९७ वर्षाच्या इतिहासात कॉम्रेड मॅरेथॉन जिंकून तो ‘फास्टेस्ट इंडियन’ बनला. या स्पर्धेत देवने ८६ किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटात पार केले व तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला.
आतापर्यंत त्याने ७० स्पर्धेत धावण्याची गती कायम ठेवली आहे. देव दररोज किमान २५ किलोमीटर धावतो. त्यासोबतच स्विमिंग, जिम आदी व्यायाम प्रकार करतो. कुठलाही कोच न घेता तो स्वयंप्रेरणेने सराव करतो. यवतमाळात त्याला शिव फिटनेस जीमचे अविनाश लोखंडे व मित्रपरिवार त्याला सर्व प्रकाराचे सहकार्य करत असतात. याशिवाय समाजातील दानशूर व्यक्तीही कायम त्याच्या पाठीशी उभे राहतात. देवपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या विक्रमाचे साक्षीदार झाले. या विक्रमाची नोंद करण्यासाठी आशिया बुक रेकॉर्डसला दर तासाला अपडेट पाठविण्यात येत आहे. स्टेडियमवर वैद्यकीय सुविधाही ठेवण्यात आली आहे. देवसोबत सर्व वयोगटातील नागरिक त्याला प्रोत्साहन देत धावत आहे.