यवतमाळ : यवतमाळहून नागपूरकडे जात असताना धावती कार पेटली. ही घटना आज शनिवारी दुपारी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबनजीक घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. .
नागपूर येथील अमोल बळीराम राठोड (२३, रा. सुख सागर सोसायटी, दाभा) हे पत्नी, मुलीसह तपोना (बोरी अरब, ता. दारव्हा) येथून स्व कार (क्र. एमएच ३२, वाय १३३५) ने नागपूरकडे निघाले होते. कळंब शहराजवळ चिंतामणी धाब्याजवळ त्यांच्या कारच्या बॉनेटमधून धूर यायला लागला. त्यांनी वाहन थांबविले व सर्व जण कारच्या बाहेर पडले. कारच्या बॅटरीच्या वायरिंगमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. कारने क्षणार्धात पेट घेतला. काही वेळातच वाहन बेचिराख झाले.
हेही वाचा…रामटेकमधून काँग्रेसच्या रश्मी बर्वे निवडणूक लढणार?
या घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील पाण्याच्या टँकरही दाखल झाला. कळंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. खासगी वाहनाने उन्हाळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास करताना सतर्कता बाळगणे गरजचे असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले.