बुलढाणा : चारचाकी वाहनांनी आलेले ‘पाहुणे’, त्यांच्या स्वागतासाठी जमलेला सोयरे आणि परिसर वासीयांचा मेळा, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, फुलांचा सडा, आनंदाने न्हावून निघालेला परिसर… आटपट बुलढाणा नगरीतील तानाजी नगरमध्ये काल संध्याकाळी असाच माहोल होता. यासाठी काही राजकीय सोहळा वा लग्न समारंभ कारणीभूत नव्हता. हा थाट होता मुलींच्या जन्माच्या स्वागताचा!

बुलढाण्यातील यशस्वी व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते रुपराव उबाळे यांच्या सुनबाईने काही दिवसापूर्वी गोंडस जुळ्या लेकींना जन्म दिला. यामुळे उबाळे परिवार आनंदाने हरखून गेला. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर या जुळ्या मुली सुनबाईच्या माहेरी होत्या. लक्ष्मीचे रूप असलेल्या या चिमुकल्या जुळ्या बहिणी घेऊन सुनबाई काल सासरी परतल्या. यावेळी सुनबाई आणि जुळ्या नातींच असं भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. त्यांची घरापर्यंत ढोलताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. जुळ्या मुली व त्यांच्या आई बापाची ओवाळणी केल्यावर त्यांनी घरात प्रवेश केला.

पण मुलीचा बाप कर…

‘पुण्य ही विधात्या माझे पाप कर.. पण मला एका मुलीचा बाप कर’ या गझलकार गोपाल मापारी यांच्या ओळी मुलींच्या जन्माचे महत्व अधोरेखित करतात. दुसरीकडे मुलींचा घटता जन्मदर चिंताजनक असताना अनेक जण मुलींच्या जन्मावर नाक मुरडतात.अश्या व्यक्ति आणि प्रवृत्तीसाठी, हा लेकींच्या जन्माचा स्वागत सोहळा एक सणसणीत चपराक ठरली!… बुलढाणा शहरातील उद्योजक रूपराव उबाळे यांचे चिरंजीव ऋषिकेश उबाळे व सौ उबाळे या दांपत्यांना नुकतेच दोन जुळ्या मुली झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आज या दोन लेकीच्या आगमना निमित्त जंगी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

उबाळे परिवाराने या कन्याचे जोरदार स्वागत केले. फटाके ढोल ताशे वाजत गाजत रॅली काढून आनंद साजरा करण्यात आला.मुलीचे आजोबा रुपराव उबाळे आजी सौ. उबाळे तसेच उबाळे, शिंदे, साखरे, तळेकर परिवारातील सर्व नातेवाईक मंडळी, व तानाजी नगर येथील बहुसंख्य नागरिक या आगमन स्वागत सोहळ्याचे साक्षीदार ठरले. यापूर्वी सुनबाईच्या माहेरातून,सात ते आठ चारचाकी वाहनाच्या ताफ्यातून या जुळ्या मुलींना तानाजी नगर मध्ये आनण्यात आले. या अभूतपूर्व स्वागत सोहळ्याचे मोठ्या समारंभासारखे चित्रीकरणही करण्यात आले.भाषणातून नुसतेच लेक वाचवा, लेक वाढवा असा कोरडा उपदेश न करता उबाळे परिवाराने केलेले लेकींच्या जन्माचे स्वागत आदर्श अन अनुकरणीय आहे.

Story img Loader