राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलहामुळे राजीनामा सत्र सुरू झाले असून ग्रामीण जिल्हाध्यक्षांपाठोपाठ ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईक यांनीही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.एका नियुक्तीमध्ये विश्वासात घेतले नाही, या कारणाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त्त सार्वजनिक होताच चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. त्यांचा राजीनामा पाहून ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी प्रदेश महिला अध्यक्षाला राजीनामा पाठविला आहे.
विशेष म्हणजे, दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता एका जाहीर सभेत महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या भाषणामुळे शरद पवार प्रभावित झाले होते. त्यानंतर पवार यांनी बेबीताई यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. महिला वर्गात बेबीताई यांची चांगली पकड आहे. ग्रामीण भागात तळागाळापर्यंत त्यांनी पक्ष पोहचविला. आता अचानक त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.राष्ट्रवादीच्या बेबीताई उईके या सामान्य कुटंबातील आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यानी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. पक्षासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या प्रामाणिक कार्याचे शरद पवार यांनी कौतुकही केले होते.