नागपूर : दिवाळीतील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (१० नोव्हेंबर) सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी नागपुरातील सराफा दुकानांत ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. खरेदीचा मुहूर्त सकाळी ९.३० वाजता असला तरी ग्राहकांनी सकाळी ९ वाजतापासूनच गर्दी केली. ग्राहकांचा कल बघता यंदा दागिने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तुटण्याची शक्यता सराफा व्यावसायिक वर्तवत आहेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण सोने-चांदी खरेदी करून घरी आणतात. या दागिन्यांची पूजा केली जाते. यंदा अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस आणि वेळेवर वेतन मिळाल्याने निम्या ग्राहकांनी आधीच दिवाळीत दागिने खरेदीसाठी अग्रीम पैसे भरून नोंदणी केली होती. या ग्राहकांसह नवीन दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी मुहूर्त असल्याने सकाळी ९ वजतापासून सराफा दुकानात दागिने घेणे व खरेदीसाठी गर्दी केली.
हेही वाचा – अमरावतीत सोनेरी मिठाईची चर्चा, यंदा फराळात १० ते १५ टक्के दरवाढ
नागपुरात मध्यंतरी २४ कॅरेटसाठी सोन्याचे दर ६२ हजार रुपये प्रति १० ग्रामवर गेले होते. पण ते खाली आल्यावर ग्राहकांकडून दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. नागपुरात १० नोव्हेंबरच्या सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार रुपये होते.
हेही वाचा – यवतमाळात कुंटणखान्यावर छापा, महिलेसह तरुण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
या विषयावर ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) उपाध्यक्ष आणि रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे म्हणाले, यंदा दागिने खरेदीकडे ग्राहकांचा चांगला कल असून सकाळपासून ग्राहक दुकानात गर्दी करत आहेत. निम्याहून जास्त बुकिंग आधीच झाले होते. यंदा सोने विक्रीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.