लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४२ एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला जात आहे. जवळपास दोन लाख महिला या मेळाव्यासाठी आणण्याचे सरकारी नियोजन सुरू आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज गुरुवारी येथील महसूल भवनात आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या ३० समित्या तयार करण्यात आल्या आहे. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास, बैठक, पाणी व्यवस्था उत्तमपणे होणे आवश्यक आहे. परिसरात स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात उभारण्यात यावे. येथे येणाऱ्या महिलांच्या गर्दी व्यवस्थापनासह स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

आणखी वाचा-नागपुरात २१ दिवसांत १५ हत्याकांड! क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले

२६ एकरवर मंडप उभारणीच्या कामाला गती आली आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी बसनिहाय समन्वयक व तालुका स्तरावर संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा जिल्ह्यात

२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचे दावेदार असताना त्यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’ करून शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे महिला मेळाव्यासाठी ते आले होते. आता तिसऱ्यांदा ते लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला मेळाव्यासाठी यवतमाळला येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabha mandap spread over 26 acres for prime minister narendra modis meeting in yavatmal nrp 78 mrj