चंद्रपूर : बिग फाईव्ह नावाने ओळखले जाणाऱ्या भानुसखिंडीत वाघांचे दर्शन न झाल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी दर्शनाविनाच रविवारी ताडोबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, छोटी तारा, मोगली, मटका, माया, भानूसखिंडीचे बछडे (बिग फाईव्ह), युवराज आदी वाघ वाघिणींचे मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर यांना दर्शन झाले. चार दिवसांच्या सफारीत अनेकांचे दर्शन झाले असले तरी भानूसखिंडीच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली.
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्व संध्येला सचिन तेंडूलकर हे पत्नी अंजली व काही मित्रांसह ताडोबात चार दिवसांचे मुक्कामी दाखल झाले होते. त्यांनी फक्त सफारीचा निसर्गानुभाव घेतला. त्यांची ताडोबाला पाचवी भेट आहे, अडीच महिन्यांपूर्वीच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ते ताडोबात येऊन गेले होते. त्यामुळे सचिनला ताडोबातील विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या अनेक वाघ वाघिणींना पाहण्याचे वेड लागले आहे.
हेही वाचा – पसंतीच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची भटकंती
गुरुवारी सायंकाळी चिमूर जवळील एका रिसार्टमध्ये त्यांचे आगमन झाल्यानंतर आल्याआल्या त्यांनी सायंकाळीच कोलारा गेटमधून कोअर झोनमध्ये सफारी केली. या ठिकाणी छोटी तारा व एका अस्वलाचे दर्शन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी त्यांनी सहपरिवार कोलारा गेटमधूनच कोअरझोनमध्ये सफारी केली. यावेळीही पुन्हा छोटी तारा नावाची वाघीण आणि मटका नावाचा वाघ व अन्य प्राण्यांचे दर्शन झाले. त्यांनतर त्याच दिवशी अलिझंझा गेटमधून बफरझोनमध्ये सफारी झाली.
हेही वाचा – नव्या धोरणानंतरही वाळूची अवैध वाहतूक, शासनाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह
या ठिकाणी भानूसखिंड नावाच्या वाघीणीचे प्रस्थ आहे. तिला बिग फाईव्ह नावाने ओळखले जाते. त्यामुळे सचिनची तिला पाहण्याची इच्छा पूर्ण होती. परंतु तिला न पाहता तिच्या २ बछड्यांना पाहता आले. तिला एकूण चार बछडे आहेत. त्यामुळेच बिग फाईव्ह नावाने ती ओळखली जाते. ती समोर न आल्याने तिला पाहण्याचा योग आला नाही. तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी अलिझंझा गेटमधून बफरमध्ये सफारी केली. यावेळी बबली नावाच्या वाघिणीने आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले. त्यांनतर भानूसखिंडीचे दर्शन होईल अशी अपेक्षा सचिन यांना होती, परंतु तिने पुन्हा सचिन यांना हुलकावणी दिली. तिला पाहता आले नाही. दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी सफारी झाली परंतु एकाही वाघाचे दर्शन झाले नाही. अन्य वन्यप्राणी त्यांना पाहता आले. त्याच दिवशीच्या सायंकाळी पुन्हा दोन बछड्यासंह बबलीचे दर्शन दिले. रविवारी शेवटच्या दिवशी सकाळी कोलारा गेटमधून कोअरझोनमध्ये प्रवेश केला. यावेळी ताडोबातील युवराज नावाचा वाघ आणि पुन्हा छोटी ताराचे दर्शन झाले. विशेष म्हणजे, ताडोबात यापुढेही वाघाच्या दर्शनासाठी तसेच जंगल भ्रमंतीचा आनंद लुटण्यासाठी येतच राहणार असेही सचिन म्हणाला.