लोकसत्ता टीम
नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना वेड लावले. सातासमुद्रापलीकडील पर्यटक इथल्या वाघांच्या दर्शनासाठी येतात. ‘मास्टरब्लास्टर’, ‘क्रिकेटचा देव’ अशा कित्येक उपाधी मिळवणारा सचिन तेंडूलकर गेल्या काही वर्षापासून नियमितपणे येथे व्याघ्रदर्शनासाठी येतो. इथल्या वाघांनाही त्याची सवय झाली आणि म्हणूनच की काय त्यातील ‘भानूसखिंडी’ या वाघिणीने शनिवारी त्याला गुगली टाकत परत पाठवले.
क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर त्याची पत्नी डॉ. अंजली व मित्रांसोबत गेल्या दोन दिवसांपासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आहे. या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात ते व्याघ्रदर्शनाचा अनुभव घेत आहेत. शनिवारी त्यांनी सफारीसाठी अलीझंझा प्रवेशद्वार निवडले. ‘बबली’ ही वाघीण आणि तिच्या बछड्यांनी त्यांना मनसोक्त दर्शन दिले. तत्पूर्वी गुरुवारी ‘छोटी तारा’ ही वाघीण, तर शुक्रवारी ‘मटका’ या वाघाने त्यांना दर्शन देत निराश केले नाही. काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या ‘भानूसखिंडी’ या वाघिणीने सचिन तेंडूलकर, त्याची पत्नी डॉ. अंजली व त्याच्या मित्रांची चांगलीच दमछाक केली.
हेही वाचा… झोपडपट्टीतील शांतनू इंगोले याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
‘भानूसखिंडी’ आणि तिच्या बछड्यांच्या दर्शनासाठी आसूसलेल्या या पर्यटकांनी अलीझंझा ते निमढेला असा प्रवास केला. मात्र, तीने या क्रिकेटच्या देवासोबत शेवटपर्यंत लपंडाव खेळला. तिने टाकलेल्या गुगलीवर तो बाद झाला आणि ‘ती’च्या दर्शनाविनाच त्याला माघारी परतावे लागले.