लोकसत्ता टीम
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांचे नाते घट्ट करण्यात या व्याघ्रप्रकल्पातील वाघांची भूमिका मोठी आहे. वाघांची एक नाही तर तीन पिढ्यांचा तो साक्षीदार राहिला आहे. नुकतेच त्याने ‘एक्स’वर याबाबत पोस्ट केली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अनेक वाघांनी जगभरातील पर्यटकांना वेड लावले आहे. त्यात ‘सेलिब्रिटीं’चा सुद्धा भरणा आहे. ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हे त्यातील एक नाव. वर्षातून एकदा तरी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला भेट दिल्याशिवाय तेंडुलकरची व्याघ्रप्रकल्पातील सफारी पूर्ण होत नाही. या व्याघ्रप्रकल्पातील गाभा आणि बफर अशा दोन्ही क्षेत्राची भटकंती ठरलेली आहे. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध अशा जवळजवळ सर्वच वाघांचे दर्शन त्याला एकदा नाही तर अनेकदा झाले आहे. ‘जुनाबाई’ ही त्यातलीच एक वाघीण. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्र म्हणजे या वाघिणीचा हक्काचा अधिवास. ती मदनापूरची वाघीण असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
आणखी वाचा-चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले “ओबीसींवर अन्याय झाला का हे तपासू”
‘जुनाबाई’ नावाच्या मंदिर परिसरात या वाघिणीचे वास्तव्य असल्याने वन्यजीवप्रेमींनी तिला ‘जुनाबाई’ नाव दिले व ती याच नावाने प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तिने १७ बचड्यांना जन्म दिला आहे. मागील कित्येक वर्षांपासून ती पर्यटकांना आकर्षित करत आहे. याच ‘जुनाबाई’ वाघिणीने सचिन तेंडुलकरला देखील भुरळ घातली आहे. केवळ ‘जुनाबाई’ वाघीणच नाही तर तिच्या तिन्ही पिढ्या या मास्टरब्लास्टरने जवळून पाहिल्या आहेत.
जुनाबाईने आजपर्यंत कंकरजरी मेल, मोठा मटका, ताला, दागोबा व आजघडीला झायलो मेलसोबत संबंध स्थापित केले आहे. त्यातूनच ती अनेक बछड्यांची आईसुद्धा झाली आहे. याच परिसरात असलेली तिची मुलगी ‘वीरा’ या वाघिणीलाही आपली दोन बछडे आहेत. या परिसरात येणान्या सचिनला ‘जुनाबाई’ व ‘वीरा’ या वाघिणीचे नेहमी आकर्षण राहिले आहे. तेंडुलकरने ‘जुनाबाई’, ‘वीरा’ आणि ‘वीरा’च्याही बछड्याचे दर्शन घेतले. सचिनने जुनाबाई वाघिणीच्या तीन पिढया पहिल्या आहेत. हीच बाब सचिन तेंडुलकरने ‘एक्स’वरून दिली आहे.