गडचिरोलो : दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे साधना जराते (२३) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात २ लहान मुले पोरकी झाली. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र, याप्रकरणी दीड वर्षानंतरही ठोस कारवाई झाली नसून प्राथमिक अहवालात साधनाच्या मृत्यूला आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे झाला नसल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील घटनेनंतर गडचिरोलीचे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
शासनाकडून गडचिरोलीच्या विकासाचे कितीही दावे केले जात असले तरी काही वर्षांपासून जिल्ह्यातील गरीब, आदिवासी जनतेच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड लपलेली नाही. ८ डिसेंबर २०२३ ला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री साधनाचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात दोन लहान मुले पोरकी झाली आहे. याविषयी हिवाळी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु दोषींना वाचवण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करून प्रकरण दडपण्यात आले. जेव्हा की सुविधाच नसताना दुर्गम भागात अशाप्रकारचे शिबिर आयोजित करण्याचे आदेश देणारे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी अद्याप मोकळे आहे. प्रसूतीनंतर झालेल्या माता मृत्यूवर देखील प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेतली होती.
आरोग्य सुविधाच आजारी
सरकारकडून एकीकडे महिला सशक्तीकरणाचा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गडचिरोलीत होणाऱ्या महिलांच्या मृत्यूकडे कायम दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत साधारण समजल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर साधनाचा मृत्यू झाला. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना गडचिरोलीतील ‘साधना’च्या मृत्यूच्या दीड वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. हा केवळ एकच महिलेचा प्रश्न नसून शेकडो साधनांचा अपुऱ्या आरोग्य सुविधेने बळी घेतला आहे. त्यामुळे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘साधना’ला न्याय देणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.