लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही सभा लोकांच्या कायम लक्षात राहतात. वर्धेत शनिवारी सायंकाळी झालेली भाजपची सभा अशीच कायमची लक्षात राहणारी ठरणार.

मुख्य वक्ते असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पट्टीचे वक्ते म्हणून ओळखल्या जातात. लोकांना खिळवून ठेवण्याचे त्यांचे कसब सर्वश्रुतच. मात्र, त्यांच्या भाषणाचा रोख प्रामुख्याने विकासकार्यवार राहिला. पण त्यांच्या पूर्वी माजी आमदार सागर मेघे यांचे थोडक्यात पण बोचरी टीका असणारे भाषण चांगलेच गाजले. भाजपने त्यांच्यावर हिंगणा तसेच वर्धा व देवळी मतदारसंघाची जबाबदारी टाकली आहे. ते गडकरींच्या सभेत आवर्जुन उपस्थित होते. त्यांचेही भाषण झाले. सभेनंतर त्याचीच चर्चा झाली.

आणखी वाचा-जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

सागर मेघे हे भाषणासाठी कधीच प्रसिद्ध नाही. थोडक्यात पण मोजके आणि स्पष्ट बोलण्याची त्यांची ख्याती आहे. भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या विरोधात उभ्या उमेदवारांचा समाचार घेताना त्यांनी स्वतःचाच प्रथम दाखला दिला. ते म्हणाले की, मी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो. तेव्हाच समजून चुकलो की राजकीय छंद कामाचा नाही आणि पूर्णवेळ आपल्या संस्थेच्या कामात गुंतवून घेतले. मात्र एक उमेदवार ( शेखर शेंडे ) हे तीन वेळा पडले, तरीही समजून घ्यायला तयार नाही. आता जनतेनेच त्यांना समजून सांगावे. राजकारणातून कायमचे हद्दपार करावे. दुसरे एक डॉक्टर ( डॉ. सचिन पावडे ) उभे आहेत. आता स्वतः मी मेडिकल कॉलेज चालवितो. त्यामुळे डॉक्टर मंडळींना किती व्याप असतो, ते मला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे हे पेशंट सांभाळणार की राजकारण करणार, समजत नाही. आमच्या एका चुलत बंधुंना ( उदय मेघे ) राजकारणाचा किडा चावला, असे बोचरे वक्तव्य सागर मेघे यांनी केले. त्यांचे हे भाषण राजकीय वर्तुळत चर्चेत आले आहे. खुद्द गडकरी हे पण त्यांच्या वक्तव्य ऐकून हसते झाले.

आणखी वाचा-रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’

मेघे यांचा राजकीय पिंड नसल्याने ते स्पष्ट बोलून मोकळे झाले, अशी प्रतिक्रिया आहे. तेवढेच दुसरे वक्तव्य उमेदवार डॉ. भोयर यांचे चर्चेत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी सूतगिरण्या उभारल्या, पण त्यांच्या वारसदारांना त्या सांभाळता आल्या नाहीत. ते मोडकळीस आलेल्या या सूतगिरण्यांचे भाडे वसूल करण्यातच खुश आहेत. एकूणच विरोधकांचे वाभाडे काढणारी ही सभा ठरली. त्याचे उत्तर विरोधक कसे देतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sagar meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss pmd 64 mrj