वर्धा : अंगीभूत प्रतिभा झाकून राहूच शकत नाही. परिस्थिती बेताची असली तरी प्रतिभेची किरणं उजाडतातच. हेच या कथेतील साहिल नंदकिशोर दरणे याने दाखवून दिले आहे. पुढील आठवड्यात तो दुबई येथील जगप्रसिद्ध अटलांटीस द पाम या हॉटेलात आयोजित कार्यक्रमात आपले फर्डे बोल व्यक्त करणार. देवळी तालुक्यातील दरणे टाकळी या लहान खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणारा साहिल पुढे देशाच्या पंतप्रधानांना चकित करणार, असे कोणी म्हणण्याचे धाडस तरी करेल कां ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोडया शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह. तशी स्थिती बेताचीच. पण वातावरण अध्यात्मिक. घरी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे वाचन. साहिल तो ग्रंथ नियमित वाचायचा. त्यातील जीवन शिक्षण या अध्यायातून त्याला जीवन प्रेरणा मिळाली. कलागूण संपन्न युवक हे गावाचे संचित हा तुकडोजी महाराजांचा जीवन सार त्याला पटला. गावातील तुकोबा ओकोबा देवस्थानाचे उपक्रम भुरळ घालत.पण संचित काही वेगळेच. परिस्थिती बेताची म्हणून साहीलला शिक्षक असलेली आत्या छबुताई झोड कळंबला शिकायला घेऊन गेली. इथेच बी. एससी. शिक्षण पूर्ण. मात्र जडणघडन झाली. गावातील वासुदेव दाभेकर या सत्संगी व्यक्तीचा संपर्क झाला. शाळेत कार्यक्रम असतांना त्यांनी साहिलचे बोल ऐकले. प्रोत्साहन दिले. साहिलने पण त्यांची संगत सोडली नाही. ते गावोगावी भजन करायचे. त्यांच्या सानिध्यात रहावे म्हणून दाभेकर यांचे कपडे प्रेस करून देण्यापासून ते सर्व ती मदत तो करायचा. आवाजातील स्पष्टता, स्वरलय, शब्दफेक व अन्य स्वर आणि वक्तृत्व संस्कार याच गुरुजींनी केले. वयाच्या १६ वर्षांपासून अशी सामाजिक बांधणी झाली. याच दरम्यान त्याची अभ्यासातील हुशारी पाहून बारावीत चांगला टक्का घे, तुला डॉक्टर करण्याची जबाबदारी माझी अशी हमी मामांनी दिली. पण वाटेत काही वेगळेच वाढून ठेवले होते. साहिल म्हणतो यश बलिदान मागते. तसेच झाले. शिक्षण नव्हे तर कलेतून जीवन घडविण्याचा त्याचा निर्धार यशस्वी ठरला. वक्तृत्व व काव्य स्पर्धेत साहिल चमकायला लागला.

एका मोठ्या दैनिकाच्या वक्तृत्व स्पर्धेत तो देशात अव्वल व अन्य एका स्पर्धेत राज्यात अव्वल आला. पुढे पुरस्कारांची लयलूटच सूरू झाली. नेहरू युवा केंद्राच्या विविध जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या. धार्मिक, राजकीय, कॉरपोरेट, शैक्षणिक कार्यक्रमात साहिल हाच निवेदक असावा म्हणून मागणी वाढू लागली. कर्नाटक येथील राष्ट्रीय युवा महोत्सव त्याने गाजवीला. ही नव्या संधीची गाज ठरली. त्याला राष्ट्रीय निवेदक चाचणीत संधी मिळाली. तिथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याला हेरले.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्या शैक्षणिक धोरणावर दिल्लीतील प्रगती मैदानावर २८ ज्यूले २०२३ रोजी असलेल्या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी ठाकूर यांनी साहिलला दिली. हे व्यासपीठ त्याने गाजवून सोडले. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील युवक हे असे असतील अशी शाबासकी दिली. हा कायमचा स्मरणीय असा क्षण. पुढे हळूहळू त्याचे बस्तान बसत गेले. युनिसेफच्या राज्य युवा संसद या उपक्रमात त्याने वर्ध्याचे प्रतिनिधित्व केले. मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून त्यास आता निमंत्रण मिळतात.रेडिओ जॉकी आहेच.विधी शाखेचे शिक्षण सूरू. सोबतच विविध कार्यक्रमातून अर्थार्जन. मासिक ५० हजार रुपये येतात. स्वतःची चार चाकी व नागपुरात फ्लॅट झाला. संस्कारभूमी म्हणून गावी जाणे असतेच.कलेतून उदरनिर्वाह होवू शकतो, हे अजिबात मान्य नसणाऱ्या त्याच्या कुटुंबास त्याने यश खेचून आणल्याचे कौतुक आहेच. नागपुरात त्याने १५ दिवसापूर्वी अल्फाज मेरे हा कार्यक्रम गाजवीला आणि त्यास दुबईची संधी मिळाली. विविध देशातील कवी या जष्ण ए मुशायरा कार्यक्रमात आपली प्रतिभा दाखविणार. त्यात खेड्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण करणारा साहिल मांड ठोकणार.