शफी पठाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे झगमगत्या शहरातील पंचतारांकित संमेलनांच्या वलयातून बाहेर पडून ‘गावाकडे चला’ अशी साद साहित्य विश्वाला घालत असल्याचे मागच्या काही संमेलनांतून ठळकपणे जाणवायला लागले आहे. मोठय़ा शहरांमध्ये संमेलनांना मिळणारा अल्प प्रतिसाद, केवळ मेजवान्यांचीच होणारी चर्चा आणि त्या तुलनेत सकस लेखनासाठी जो अनुभवांचा विशाल पट हवा त्याचे ग्रामीण लेखनातून सातत्याने होणारे दर्शन, पुस्तक विक्रीला मिळणारा भरगच्च प्रतिसाद या बाबी लक्षात घेऊन महामंडळाने आधी उस्मानाबाद, नंतर उदगीर, वर्धा आणि आता तर चक्क तालुक्याचे ठिकाण असलेल्या अमळनेरला पसंती दिली आहे.

९७ व्या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) अशा दोन, खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तर मराठवाडय़ातून जालन्याचा प्रस्ताव होता. परंतु, साहित्य महामंडळाच्या रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत अमळनेरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. उस्मानाबाद, उदगीर अशा छोटय़ा शहरांमध्ये संमेलनाचे प्रयोग मोठय़ा शहरांच्या तुलनेत जास्त यशस्वी झाल्याने साहित्य महामंडळाने या क्रमात याहीवेळी अमळनेरच्या पदरात संमेलनाचे दान टाकले. ग्रामीण भागातील वाचकांची वाङ्मयीन भूक जास्त आहे. शिवाय सकस लेखनासाठी अनुभवांचा विशाल पटही ग्रामीण लेखकांच्या लेखनीतून कायम झळकत असतो. परंतु, आधी महामंडळाकडून सुविधांचा जास्त विचार केला जायचा. उस्मानाबादच्या संमेलनापासून मात्र हे चित्र बदलले आहे. उस्मानाबादसारख्या माागास भागात संमेलन उभे करण्याचे धाडस ठाले पाटील यांनी केले. ते संमेलन कुठल्याही राजाश्रयाशिवाय गुणात्मक आणि संख्यात्मकदृष्टय़ाही यशस्वी झाले. तेव्हापासून साहित्य महामंडळाचा ग्रामीण भागातील संमेलनांवरचा विश्वास वाढला आहे. यंदा अमळनेरला संमेलन मिळण्यालाही हाच विश्वास कारणीभूत ठरल्याचे महामंडळाच्याच एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

साने गुरुजींच्या कर्मभूमीला ७२ वर्षांनी पुन्हा संधी

अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी. बहिणाबाई, ना. धों. महानोर यांचा शब्दसहवासही या जिल्ह्याला लाभला आहे. १९५२ साली कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अंमळनेरला संमेलन झाले. त्यानंतर मात्र अनेकदा प्रयत्न करूनही अंमळनेरचा विचार झाला नाही. यावेळी मात्र साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीतील महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व सर्व संमतीने मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर या संस्थेची शिफारस केली. ..आणि अखेर पुण्यातील रविवारच्या बैठकीत महामंडळाने ७२ वर्षांनंतर साने गुरुजींच्या कर्मभूमीला पुन्हा संमेलनाची संधी दिली.
साने गुरुजींनी येथे शाळेत शिकवत असताना ‘‘विद्यार्थी’’ नावाचे एक मासिक प्रकाशित केले. ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. नंतर त्यांची वाङ्मयीन प्रतिभा अवघ्या साहित्य विश्वाने अनुभवली. त्यांच्या कर्मभूमीत हे संमेलन ७२ वर्षांनंतर पुन्हा होत आहे. अंमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्यामुळे साऱ्यांच्या साक्षीने आणि सहकार्याने अंमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नक्कीच यशस्वी करेल. – डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya corporation statement regarding the five star meetings in the city amy