वर्धा : गांधीभूमीत संमेलन, पण ना परिसंवादात, ना उपक्रमात, ना कुठे स्थान. साधे निमंत्रणही मिळू नये, अशा शब्दात गांधीवादी वर्तुळातून नाराजीचे सूर उमटत आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या कोकणातील गागोदे आश्रमाचे कर्ते विजय दिवाण यांचा स्वर सर्वात प्रखर. ते स्वतः संमेलनात विनोबाजींच्या साहित्याचा स्टॉल लावण्यास आले आहे.
आम्हास साधे निमंत्रणही नाही. गांधी-विनोबांच्या कर्मभूमीतच त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्ते व संस्थांची उपेक्षा आयोजकांनी करावी, ही खेदाची बाब आहे. नई तालीम, मगन संग्रहालय, ग्रामसेवा मंडळ, दलितांना खुले झालेले पहिले असे लक्ष्मीनारायण मंदिर व अन्य संस्थांचे तसेच जमनालाल बजाज, मनोहर दिवाण, सुशीला नायर, श्रीकृष्ण दास जाजू यांचे विस्मरण व्हावे, हे सारे दुःखदायक आहे. ‘गांधीजी ते विनोबाजी’ या परिसंवादात गोवा, मुंबई, दिल्लीचे विद्वान आहेत. मात्र येथील गांधीवादी नाहीत, अशी खंत दिवाण यांनी व्यक्त केली आहे.