यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांची व्यथा थेट अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावरून जगापुढे मांडून प्रकाशझोतात आलेल्या वैशाली येडे यांचा संघर्षातून स्वयंसिद्धतेकडे सुरू असलेला प्रवास अनेक कुटुंबातील एकल महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर या छोट्याशा गावात वास्तव्यास असलेल्या वैशाली येडे यांची महाराष्ट्राच्या साहित्य आणि सामाजिक वर्तुळात चर्चा होते. त्याचे कारणही तसेच आहे. यवतमाळ येथे २०१९ मध्ये झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा सन्मान वैशाली येडे यांना मिळाला होता. त्यावेळी वैशाली येडे यांनी उद्घाटनपर भाषणातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांचा संघर्ष जगासमोर मांडला. “अडचणीच्या वेळी दिल्लीची नव्हे, तर गल्लीतील बाईच कामी येते”, अशा शब्दांत उद्घाटक म्हणून मिळालेल्या संधीबद्दल व्यक्त होत वैशाली येडे यांनी, विधवा म्हणून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना अबला ठरवू नका. आम्ही पुरुषांप्रमाणे आत्महत्या करायला कमकुवत मनाच्या नाही आहोत. आम्ही महिला आहोत आणि संघर्षातून उभे राहण्याची क्षमता आपल्यात असल्याचे ठामपणे सांगितले होते. व्यवस्थेच्या नाकर्तेपणामुळे भाळी वैधव्य आले तरी व्यवस्थेमुळे पिचलेल्या महिलांसाठी सदैव लढणार असल्याचे वैशाली येडे यांनी तेव्हा सांगितले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘त्या’ भाषणातील शब्द आणि शब्द खरा करण्याचा प्रयत्न वैशाली येडे यांनी चालविला आहे.

हेही वाचा – नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’, रामटेक पुन्हा चर्चेत, काय आहे कारण?

यवतमाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतील प्रा. घनश्याम दरणे यांच्या प्रयत्नांमुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून संधी मिळाली, असे वैशाली येडे म्हणाल्या. उद्घाटक म्हणून नावलौकिक मिळल्यानंतर अनेक संस्था आपल्याशी जुळल्या. मात्र आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ या संघटनेने कायम आधार दिला. स्वतः बच्चू कडू हे राजूर या गावी भेटायला आले. घराची अवस्था पाहून घर बांधण्यासाठी मदत केली. माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेस थेट २०१९ मध्ये प्रहार पक्षाच्या वतीने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत २० हजारांवर मते मिळाली. तेव्हा, आपल्यासारख्या सामान्य महिलेच्या पाठीशी इतके सारे लोक असल्याचे बघून काम करण्याचा विश्वास बळावला, असे वैशाली येडे म्हणाल्या.

मोठा मुलगा कुणाल दोन वर्षांचा आणि मुलगी जानवी केवळ एक महिन्याची असताना पती सुधाकर येडे यांनी २ ऑक्टोबर २०११ रोजी आत्महत्या केली. तेव्हा बाळंतपणाला मी माहेरी डोंगरखर्डा (ता. कळंब) येथे गेली होती. आम्ही कोणीच घरी नसताना पती सुधाकर यांनी अवेळी जीवनयात्रा संपविल्याने मी कोलमडून पडले. पती सुधाकर, त्यांचे आई-वडील, भाऊ अशी सर्व परिवाराची एकत्रित कोरडवाहू आठ एकर शेती. मात्र शेती कायमच तोट्यात राहत असल्याने आलेल्या नैराश्यातून पती सुधाकर यांनी टोकाचा निर्णय घेतला. तेव्हापासून संघर्ष सुरू झाला. आता आपण स्वतः घरची पतीची शेती वाहत असून मुलगा कुणाल आणि मुलगी जानवी यांना खूप शिकवायचे आहे. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष मुलांच्या वाट्याला येऊ नये, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

पती निधनानंतर ‘इसार’ या सामाजिक संस्थेत दिवाकर भोयर यांच्या मार्गदर्शनात काम सुरू केले. त्यांच्याच प्रयत्नातून वर्धेत ‘नाम’ संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. तेथे हरीश इथापे यांच्याशी परिचय झाला. त्यांना माझा संघर्ष सांगितला. त्यांनी लेखक श्याम पेठकर यांची भेट घडवली आणि त्यानंतर शेतकरी विधवा महिलांची व्यथा रंगभूमीवर मांडणाऱ्या ‘तेरवं’ या नाटकाचा जन्म झाला, असे वैशाली येडे यांनी सांगितले. या नाटकात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. मोठ्या शहरांमध्ये प्रयोग झाले. एक ओळख मिळाली. कोरोनानंतर प्रकृती ठीक नसल्याने रंगभूमी आणि सामाजिक कामापासून दूर होते. मात्र आता नव्याने ‘तेरवं’ चे प्रयोग करायचे आहेत, असे वैशाली येडे यांनी सांगितले.

एकल महिलांसाठी काम

सामाजिक संस्थेत काम करत असताना यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश भोयर यांच्याशी परिचय झाला. आपला संघर्ष, काम करण्याची जिद्द बघून त्यांनी स्वतः थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मी विधवा आणि नीलेश यांचे हे पहिलेच लग्न! लोक, समाज काय म्हणेल म्हणून मी काहीही निर्णय दिला नाही. मात्र ते निर्णयावर ठाम होते. अखेर त्यांचे व माझे कुटुंबीय, माझी दोन्ही मुले यांच्याशी चर्चा करून आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये आम्ही विवाह केला. आता पती नीलेश यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सामाजिक काम व एकल महिलांसाठी काम सुरु केले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना स्वयंसिद्ध करायचे आहे. एकल महिलासुद्धा ठरविल्यास काहीही शक्य करू शकते, हे माझ्या अनुभवातून असंख्य महिलांना पटवून दिले आहे. ‘चूल आणि मूल’ या पलिकडे महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते, हा विश्वास मला या संघर्षातून मिळाला, असे वैशाली येडे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाल्या

Story img Loader