सशस्त्र सदस्यत्वासाठी गणपतीकडे मागणी
उच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्याने पुन्हा चर्चेत आलेला जहाल नक्षलवादी साईबाबा हा कट्टर लोकशाहीवादी कार्यकर्ता आहे, असा दावा देशातील संघटना करत असल्या तरी याच साईबाबाने चळवळीत काम करीत असताना शस्त्राधारी सदस्याची जबाबदारी द्या, असा आग्रह गणपतीकडे धरला होता, अशी माहिती एका पत्रातून समोर आली आहे.
दिल्लीतील एका विद्यापीठात इंग्रजीचा प्राध्यापक असलेल्या साईबाबावर सध्या नक्षलवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून गडचिरोलीच्या सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. मध्यंतरी प्रकृतीच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला दिलेला जमीन नागपूर खंडपीठाने रद्द केल्याने सध्या तो येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. साईबाबा नक्षलवादी नाही. तो दलित, शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आवाज उठवणारा एक लोकशाहीवादी कार्यकर्ता आहे, असा दावा देशातील अनेक संघटनांकडून सध्या केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गडचिरोलीच्या न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातील एक पत्र साईबाबाच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारे आहे. विशेष म्हणजे, हे पत्र खुद्द साईबाबानेच गणपतीला लिहिले आहे. अटकेच्या काही दिवस आधी लिहिलेले हे पत्र साईबाबाच्या संगणकातून जप्त करण्यात आले, असा पोलिसांचा दावा आहे.
या पत्रात साईबाबाने मला जंगलातील कामगिरी सोपवा, असा आग्रह गणपतीकडे धरला होता. दिल्लीत बसून शहरी भागात काम करणाऱ्या समर्थक संघटनांमध्ये समन्वयाचे काम करून कंटाळलो असून, मी केवळ अपंग असल्यामुळे मला हे बैठे काम देण्यात आले आहे. हे काम करण्याची माझी आता अजिबात इच्छा नसून प्रत्यक्ष जंगलात तुमच्यासोबत शस्त्र हाती घेऊन लढण्याची माझी इच्छा आहे. जंगलातील कोणतीही कामगिरी पार पाडण्यास मी तयार असून त्यासाठी माझे अपंगत्च आड येणार नाही, अशी ग्वाही या प्राध्यापकाने गणपतीला दिली आहे. शहरी भागात काम देऊन चळवळीने मला दुसऱ्यांदा अपंगत्च बहाल केले आहे, अशी टीकाही त्याने या पत्रात केली असून, आपल्या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती गणपतीला केली आहे. याच पत्रात त्याने शहरी भागात उत्तम काम चालले असून समर्थक संघटनांना निधीची चणचण भेडसावते आहे, याकडेही गणपतीचे लक्ष वेधले आहे. जंगलात काम दिले नाही, तर राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी भाषाही त्याने पत्राच्या शेवटी वापरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा