अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे, त्यांच्या व्यथा, अपेक्षा जाणून घेण्यासाठी आपण संपूर्ण राज्याचा दौरा करीत असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कृषी धोरणात बदल करण्याची आवश्यकता असेल, तर तेही करू, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिली.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. सत्तार यांचे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास साद्राबाडी येथे आगमन झाले. त्यांनी गावातील शेतकरी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी मुक्काम केला. आगमनानंतर गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून विविध विषयांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे गुरुवारी सकाळी सावलकर तसेच इतर शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शेतीविषयक अडचणी, आवश्यक उपाययोजना, याबाबत चर्चा केली.

हेही वाचा : अमरावती : कृषीमंत्री मेळघाट दौऱ्यावर असतानाच शेतकऱ्याने केली आत्महत्या

गावातील प्रत्येक घराला भेट देऊन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.अतिवृष्टीमुळे मेळघाटातही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आता आधाराची गरज आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आपण यापूर्वी अमरावती दौऱ्याच्या वेळी दिले होते. मदतीपासून कुणीही शेतकरी वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांविषयी आपुलकी, आस्था आहे.

हेही वाचा : बुलढाणा : शिक्षकी पेशाला काळिमा ; शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहिली अन्…

सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण तीस दिवसांच्या या उपक्रमानंतर कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत, असेही सत्तार यांनी सांगितले. या दौऱ्याच्या वेळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हेही उपस्थित होते.

Story img Loader