लोकसत्ता टीम
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील मर्दहूर येथील साईनाथ नरोटे हा गडचिरोलीत राहून पोलिसांना माहिती पुरवीत असल्यानेच त्याची हत्या केली, असे नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल विभागाचा प्रवक्ता श्रीनिवास याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी नक्षल्यांचे आरोप फेटाळून लावत साईनाथ नरोटे हा खबऱ्या नव्हे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उच्चशिक्षित युवक होता, असे म्हटले आहे.
नक्षलवाद्यांनी १० मार्च रोजी साईनाथची हत्या केली होती. यासंदर्भात श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. साईनाथ हा मागील काही वर्षापासून उच्चशिक्षणाच्या नावाखाली भामरागड व गडचिरोलीत राहत होता. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांना मदत करीत होता. पोलिसांच्या मदतीनेच तो पोलीस भरतीत सहभागी झाला, म्हणून त्याची हत्या केली, असे श्रीनिवासने म्हटले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मर्दहूर येथील देविदास गावडे नामक युवकास अटक केली. देविदास हा काही वर्षांपूर्वी नक्षल दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर त्याने दलम सोडले. पुढे अनेक वर्षे कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर तो गावात राहून शेती व ग्रामसभेचे काम करीत होता. पोलिसांनी त्याला नाहक अटक केली. शिवाय गावातील आणखी १० नागरिकांनाही अटक केली, असेही श्रीनिवासने म्हटले आहे.
आणखी वाचा- ठाकरेंच्या कार्यकाळात पायाभूत प्रकल्पांकडे दुर्लक्ष, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
नक्षल्यांच्या या पत्राला पोलिसांनीही एका पत्राद्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. साईनाथ हा एक गरीब व होतकरू विद्यार्थी होता. तो मागील ३ वर्षांपासून गडचिरोलीत राहून लिपीक, तलाठी, पोलीस व अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. पोलीस भरतीत २५ हजार युवक, युवतींनी सहभाग घेतला, ते सर्व जण पोलीस खबरीच होते काय? देविदास उर्फ प्रकाश उर्फ आडवे मुरा गावडे नक्षलवाद्यांना सहकार्य करीत होता. साईनाथच्या हत्येत त्याचा सहभाग होता. याप्रकरणी केवळ त्यालाच अटक करण्यात आली असून, गावातील कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.