अकोला : स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने अकोल्यात आक्रमक भूमिका घेतली. विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आहे. इतिहासाचे विकृतीकरण व सतत महापुरुषांच्या बदनामीचा निषेधही नाेंदवण्यात आला.
अखंड गरजवंत मराठा समाजाच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. मराठा आरक्षणचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यासाठी विविध पातळीवर आंदोलने करण्यात आली. शासनाने मराठा समाजाची आरक्षणच्या नावावर दिशाभूल केली. आता मराठा समाजाचा संयम सुटत आहे. त्यातच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरण चिघळले. सर्वसामान्यांचा शासनावरील विश्वास उडत आहे. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा अपमान वेळोवेळी होत आहे. या सर्व प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीची मागणी मराठा समाजाने केली. स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल अटक करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना तातडीने फाशी द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माॅ जिजाऊ, शहाजीराजे यांच्यासह विविध थोर पुरुषांबाबत अपमानास्पद बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, चित्रपट, नाटक, साहित्य, पुस्तके यांच्या माध्यमातून होणारी थोर पुरुषांची बदलामी थांबविण्यात यावी व विकृत इतिहास लिहिणारे व सांगणारे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याना अटक करण्यात यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे, समाजसेविका अंजली दमानिया यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. आंदाेलनात देवराव पाटील, राजेश देशमुख, गजानन हरणे, दादाराव पाथ्रीकर, अशोक पटोकार, प्रदीप खाडे, राम मुळे, विनायक पवार, सुभाष पाटील, मंगेश काळे, प्रदीप चोरे, नंदकिशोर गावंडे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा आदींसह समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.
‘आश्वासन पूर्ती करा, सातबारा कोरा करा’
भाजप नेत्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. शासनाने त्वरित मागण्या मान्य करून न्याय न दिल्यास जन आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा समाजाकडून देण्यात आला आहे.