भंडारा : जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळे साखरा फाट्याजवळ असलेल्या टोल नाक्याच्या पादचारी आकाश मार्गिकेच्या छताची टीनपत्रे एका बाजूने उडू लागली. यामुळे वाटसरू आणि प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला. एका वादळातच छताची अशी अवस्था झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लाखांदूर तालुक्यातून पुढे गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या सिमेंटकरणाचे काम पूर्ण झाले असून अगदी काही महिन्यातच या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची ओरड नागरिकांकडून होतच आहे. मात्र असे असले तरी सिमेंट रस्त्याच्या खर्चाची वसुली म्हणून वाहनधारकांकडून वसूल केली जाते. त्यासाठी तालुक्यातील साखरा फाट्यावर टोलनाका उभारण्यात आला आहे. सध्या टोलनाका सुरू झाला नसला तरी बांधकाम अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकरच टोल वसुली सुरू होईल. रस्त्याच्या सिमेंटीकरनाप्रमाणेच या टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला तयार करण्यात आलेल्या पादचारी आकाश मार्गिकेच्या छतावरील पत्र्याची फिटिंग आणि नट बोल्ट लावण्याचे काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
हेही वाचा >>>नितीन गडकरींनी उलगडला शैक्षणिक प्रवास; म्हणाले, “मला इंजिनिअर व्हायचे होते, पण डॉक्टर झालो, तरीही…”
काल वादळाने या आकाश मार्गिकेची एका बाजूची टिन पत्रे खळखळ वाजत उडू लागली. यावेळी टोल नाक्यावरून आ करणाऱ्या प्रवाशांची धडकी भरली. टिन पत्रे उडून कुणाला दुखापत तर होणार नाही? अशी भीती वाटू लागल्याने काही प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पादचारी आकाश मार्गिकेच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच योग्य रित्या काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे.