गोंदिया:- सध्याच्या काळात माणुसकी हरवत चालली व स्वार्थी पणाच्या समाजात प्रामाणिकपणा औषधाला मिळेनासा झाला आहे की काय ? आपले सख्खे अगदी जवळचे ही मतलबी झाले आहेत असे व्यवहारात बोलले जाते.

परंतु साकोली एस.टी. महामंडळाच्या बस वाहकाने चक्क ११ हजार रुपये रोख असलेला पर्स प्रवाशाला परत केला. या घटनेने आजच्या या युगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याची साक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे बस वाहक पंजाब श्रीरामे यांनी पटवून दिली. विश्वास न बसणारी पण अगदी सत्य असणारी ही घटना आजही समाजामध्ये नवा आदर्श घालून देते.

सविस्तर असे की गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील प्रभाग क्रमांक १ मधील रहिवासी यादवराव बोरकर हे साकोली आगाराच्या साकोली ते संभाजीनगर या बसने २८ फेब्रुवारीला सकाळी खामगावला नोकरीवर असलेल्या मुलांकडे नातीच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक गेले होते. खामगाव बस स्थानकावर ते उतरले. मात्र प्रवासा दरम्यान खामगांवात त्यांची पर्स बसच्या  सीटवरच राहिली त्यात मुळ कागदपत्रे व ११ हजार रुपये रोख होते.

वाहकाला बसमध्ये सापडलेली ही रोख रक्कम व कागदपत्रे त्या प्रवाशाला परत करून वाहकाने प्रामाणिकपणाचा परिचय दिला.त्यांच्या या कृतीतून अजूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय आला. पंजाब श्रीरामे असे त्या प्रामाणिक बसवाहकाचे नाव आहे.यादवराव बोरकर  घरी गेल्यावर त्यांना आपली पर्स हरविल्याचे लक्षात आले. दरम्यान वाहक पंजाब श्रीरामे यांना सीटवर ते पाकीट सापडले. त्यांनी पाकीटमध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारावर संबंधित प्रवाशांपर्यंत पोहोचण्या करिता हा संदेश साकोली येथील समाज माध्यमाशी संलग्न असलेल्या एका व्हॉट्सअपग्रुपवर टाकला.

तो संदेश समाज माध्यमांतून सर्वत्र प्रसारित झाला. नवेगावबांध जवळील पांढरवाणीचे रहिवासी असलेले वाहक नास्तिक सोनवाणे यांनी येथील आपल्या मित्रांना ही माहिती दिली. अखेर नवेगावबांध येथील त्यांचे नातेवाईक एकनाथ बोरकर यांच्यापर्यंत संदेश पोहोचला. तेव्हा त्यांनी यादवराव बोरकर यांना ही माहिती दिली. यानंतर वाहक श्रीरामे यांनी यादवराव बोरकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांचे पैसे व कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती फोनवर संपर्क साधून दिली. ३ मार्च रोजी खामगाव बसस्थानक अधीक्षक स्वाती तांबे, साकोली आगाराचे वाहक पंजाब श्रीरामे व चालक भूषण निखाडे यांनी ती पर्स यादव बोरकर यांच्या सुपूर्द केली.

वाहक पंजाब श्रीरामे व चालक भूषण निखाडे यांचा प्रामाणिकपणा पाहून यादवराव बोरकर यांचे अंतःकरण भरून आले. माणसाने माणूसकी जपली की देवही आपल्या सोबत कधीच वाईट करणार नाही. स्वकष्टाने कमावलेले जे असते, ते आपले असते. बाकी उर्वरित दुसऱ्यांचे असते. त्यामुळे आपले नसतानाही आपले म्हणणे हे माणुसकीला न शोभणारे आहे. आपल्या सेवा काळात असे अनेक प्रसंग आले. पण ज्याचे त्यांना परत करण्यातच मला नेहमी आनंद वाटत राहिला आहे.-पंजाब श्रीरामे वाहक, बस स्थानक साकोली.

बसवाहक पंजाब श्रीरामे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे. प्रामाणिकपणा अजूनही कायम असल्याचा प्रत्यय मला या घटनेतून आला.- यादवराव बोरकर, रहिवासी नवेगावबांध.

Story img Loader