Sakoli Constituency : गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाच्या परिणय फुके यांचा पराभव करत साकोली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढाई बघायला मिळाली होती. खरं तर २०१४ साली नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, ही गोष्ट भाजपाच्या प्रचंड जिव्हारी लागली होती; तेव्हापासून नाना पटोले हे भाजपाच्या हिटलिस्टवर आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली खरी, पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे यंदा नाना पटोले यांना रोखण्यासाठी भाजपा आणखी वेगळी खेळी करण्याची शक्यता आहे.
साकोली मतदारसंघाचा राजकीय इतिहास कसा राहिला?
साकोली हा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असून या मतदारसंघाची निर्मिती १९६२ साली झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बाल्लेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर १९६२ साली काँग्रेसचे अडकुजी फुलसाडगे हे पहिले आमदार झाले. त्यानंतर १९६७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाचे शामराव कापगटे यांनी विजय मिळवला, तर पुढे १९७२ साली काँग्रेसच्या मार्तंड कापगाटे यांनी विजय मिळला. त्यानंतर १९८५ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता.
हेही वाचा – “उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
पुढे १९९० आणि १९९५ या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे हेमकृष्ण कापगाटे विजयी झाले. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली पुन्हा काँग्रेसने ही जागा जिंकली, पण २००९ मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये भाजपाच्या राजेश काशिवार यांनी विजय मिळवला, तर गेल्या निवडणुकीत म्हणजेच २०१९ साली नाना पटोले हे पुन्हा या मतदारसंघातून विजयी झाले.
गेल्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा ६ हजार २४० मतांनी विजय झाला. नाना पटोले यांना एकूण ९५,२०८ मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार परिणय फुके यांना ८८ हजार ९६८ मते मिळाली. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे सेवकभाऊ वाघये, बहुजन समाज पक्षाचे डॉ. प्रकाश मालगवे हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते. सेवकभाऊ वाघये यांना ३४,४३६ तर प्रकाश मालगवे यांना ३,६५० मते मिळाली होती.
या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
सद्यस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षच या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. नाना पटोले या मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधातभाजपाने अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे. अविनाश ब्राह्मणकर यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा जिल्हा परिषदेचे गटनेते होते. एक कुणबी चेहरा म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडं बघितला जातं. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने डॉ. अविनाश नन्हे यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा – अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदावारांचे राजकीय गणित? चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत ‘उदंड जाहले अपक्ष’
नाना पटोले यांचा जनसंपर्क आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवत असल्याने साकोली मतदारसंघातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यात सर्वसामान्यांचा त्यांच्याप्रती कल सकारात्मकतेकडे झुकणारा आहे. भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांना पक्षात प्रवेश देऊन पटोले यांनी पोवार समाजाला काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. पटोले यांच्यावर भाजपाने अन्याय केला, अशी भावना पोवार समाजात आहे.
साकोली मतदारसंघात जातीय समीकरण निवडणुकीत कायम प्रभावी ठरले आहे. येथे कुणबी, तेली, पोवार आणि कोहळी समाजाची संख्या अधिक आहे. सर्वाधिक मतदार कुणबी समाजाचे आहेत. हे बघता भाजपाने कुणबी समाजातून उमेदवार दिला आहे. त्यामुळे नाना पटोले गढ राखतील, की साकोली मतदारसंघातील जनता इतर उमेदवाराला संधी देईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.