लोकसत्ता टीम

नागपूर : नुकतेच आपले शतकोत्तर वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चालू खात्यात ठणठणाट असल्याची माहिती आहे. बँकांमध्ये कोट्यवधींच्या मुदत ठेवी करण्यावर वित्त व लेखा अधिकारी हरीश पालिवाल यांचा भर आहे. यामुळे तासिका प्राध्यापकांचे अनेक महिन्यांचे वेतन थकले आहे. हरीश पालिवाल यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. तसेच या विद्यापीठाकडे अनेक दानदात्यांनी त्यांची संपत्ती दान केली आहे. यातून विद्यापीठाकडे कोट्यवधींची संपत्ती गोळा झाली आहे. पाचशे कोटींहून अधिक रकमेच्या मुदत ठेवी आहेत. असे असतानाही कंत्राटदार किंवा तासिका प्राध्यापकांचे वेतन रखडत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आणखी वाचा-जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…

विशेष म्हणजे, विद्यापीठाकडे येणाऱ्या पैशांच्या मुदत ठेवी करण्यावर भर असल्याची चर्चा आहे. यामुळे विद्यापीठाच्या चालू खात्यात ठणठणाट आहे. परिणामी, तासिका प्राध्यापक तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात अनेक वर्षांपासून नियमित प्राध्यापक भरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तासिका प्राध्यापकांवर अनेक विभागांची धुरा आहे. असे असतानाही या प्राध्यापकांना वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

शासनाच्या नियमांना बगल

१४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना सेवार्थ प्रणालीद्वारे दर महिन्याला वेतन निर्गमित करणे गरजेचे आहे. असे असतानाही शैक्षणिक सत्र सुरू होऊनही वेतन प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडूनही दरवर्षी नियमित वेतन देण्यासंदर्भात आदेश दिले जातात. त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

आणखी वाचा-पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली

मुदत ठेव कुणाच्या फायद्याची

नागपूर विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडून विद्यापीठात असणारे जमा पैशांची वारंवार मुदत ठेव केली जात असल्याची माहिती आहे. भविष्यातील आवश्यक खर्च लक्षात न घेता चालू खात्यावरील पैशांची ही मुदत ठेव बनवली जात आहे. यामुळे वित्त अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाला वारंवार मुदत ठेव करण्याची गरज काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

मुदत ठेवी केल्या जातात हा आरोप चुकीचा आहे. विभाग प्रमुखांकडून वेळेत प्रस्ताव आल्यास वेतन दिले जाते. यात काही अडचणी आल्या तरच वेतन रखडते. तासिका प्राध्यापकांचे वेतन थांबवणे हा उद्देश नाही. ते आमच्या विद्यापीठाचे कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन वेळेत देण्यावर आमचा भर आहे, असे नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालिवाल यांनी सांगितले.

Story img Loader