चंद्रपूर : पाचशे रुपयांच्या नकली नोटासह यवतमाळ जिल्ह्यातील हनुमान भोजेकर (२४) व सैफुद्दीन जलाउद्दीन सैय्यद (२२) दोघेही रा. वणी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ४० हजार रुपयात ५ लाखांच्या नकली नोटांची विक्री करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवार १४ जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर जिल्ह्यात निखिल भोजेकर नावाचा व्यक्ती हा अनेक दिवसांपासून कमी किमतीत नकली नोटांचा पुरवठा करतो. तो चंद्रपूर जिल्ह्यात नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. याप्रकरणी सापळा रचत राजुरा ते आसिफाबाद मार्गावरील रेल्वे लाईनजवळ सापळा रचण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर व पथकाने मारुती आर्टिगा वाहनाला थांबवले असता त्यामधील वाहनांची झडती घेण्यात आली. वाहनांमध्ये पोलिसांना ५०० रुपये नोटांचे बंडल आढळले, त्यामध्ये नकली नोटा ओळखू येऊ नये यासाठी मागे-पुढे चलनातील नोटा लावण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणुकीत मविआची जागांची अदलाबदल, नागपुरात काँग्रेसचा पाठिंबा कोणाला?

नोटांवर चिल्डरन्स बँक असे छापील होते, नकली नोट सहित एकूण १० लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी निखिल हनुमान भोजेकर (२४) व सैफुद्दीन जलाउद्दीन सैय्यद (२२) दोघेही रा. वणी जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर ४२० व ३४ कलम अंतर्गत गुन्हा राजुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, नितीन रायपूर यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of fake notes of 5 lakhs for 40 thousand nagpur rsj 74 ysh