यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप–प्रत्यारोपाने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. झरी तालुक्यातील रुईकोट परिसरातील संत जगन्नाथ महाराज संस्थेला पाच एकर जमीन दान मिळाली. ही संस्थेची जमीन धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता सप्टेंबर २०२३ मध्ये संस्थेच्या सचिवांनी बी. एस. इस्पात कोळसा कंपनीला उत्खननासाठी ताब्यात दिली. या कंपनीने एक वर्षाच्या काळात या जमिनीतून ५० कोटी रुपयांपर्यंत कोळसा विकला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
कृष्णराव मंदावार यांनी जगन्नाथ महाराज देवस्थानासाठी पाच एकर जमीन दान दिली होती; परंतु देवस्थानचे सचिव संजय देरकर यांनी बी. एस. इस्पात कोळसा कंपनीला सप्टेंबर २०२३ मध्ये कोणत्याही कार्यालयाची परवानगी न घेता जमीन उत्खननासाठी ताब्यात दिली, असे नांदेकर म्हणाले. या प्रकाराची तक्रार जगन्नाथ महाराजांचे भक्त बंडू देवाळकर यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, सहायक धर्मदाय आयुक्तांकडे केली. त्यानंतर देरकर यांनी १७ ऑक्टोबरला जमिनीची उधारीत विक्री केल्याचा आरोपही विश्वास नांदेकर यांनी केला.
हेही वाचा…गुजरातच्या ‘पटेलां’चे अमरावतीच्या निवडणुकीवर लक्ष !
या अगोदर कंपनीच्या नावाने जमीन नसताना कंपनीने या जमिनीवर खोदकाम करून कोळसा काढला आहे. या प्रकरणाची तक्रार उच्च न्यायालयाच्या वकिलामार्फत चंद्रकांत घुगुल व गोविंदा निखाडे यांनी संबंधित विभागाला व देरकर यांना नोटीस दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून प्रशासनाने जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याप्रकरणी मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असून याला देरकर हेच जबाबदार असल्याचा नांदेकरांनी केला आहे. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागून फौजदारी प्रक्रिया करण्यात येईल, असे नांदेकर म्हणाले. पत्रकार परिषदेला चंद्रकांत घुगुल, भाग्यश्री वैद्य आदी उपस्थित होते.
हेही वाचा…Video : वडेट्टीवार कन्येची शिव्यांची लाखोली, मोबाईल टॉर्चमधल्या सभेत नेमकं काय घडलं? वाचा…
प्रक्रिया नियमानुसार
जगन्नाथ महाराज संस्थानची जमीन वेकोलिने घेतली. ही संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार, विविध विभागाच्या परवानगीने झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून हे संस्थान कार्यरत आहे. आजपर्यंत असे कोणतेही आरोप संस्थानवर करण्यात आले नाहीत. अशा आरोपांमुळे संस्थानची बदनामी होत आहे. निवडणुकीमध्ये विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने असे खोटे आरोप करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात संबंधितांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
© The Indian Express (P) Ltd