चंद्रपूर : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. अशातच कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण एका दिवसात बाजारपेठेतून बेपत्ता झाले आहे. ८०० रुपये प्रतिबोरीचे हे वाण १३०० ते १४०० रुपयांत शेतकऱ्यांना विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, बियाणे व खतांच्या काळ्याबाजारावर आळा घाला, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
या जिल्ह्यात कपासीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळी हंगाम सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कबड्डी आणि पंगा या कापसाच्या वाणाला पसंती दिली आहे. गुरुवार १ जूनपासून बाजारात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. कापसासाठी कबड्डी व पंगा हा वाण प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. मात्र काही तासांतच सदर वाण प्रकार बाजारपेठेतून गायब झाल्याचे समोर आले आहे. सदर वाण संपले असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. हा प्रकार चिंताजनक असून मोठी साठेबाजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ८०० रुपये प्रतिबोरीप्रमाणे मिळणारे हे वाण १३०० ते १४०० रुपये अशा महागड्या भावाने शेतकऱ्यांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्येही मोठा रोष निर्माण झाला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आहे.
हेही वाचा – बुलढाणा : खामगाव परिसरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला, २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
या वाणाची साठेबाजी करणाऱ्या कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून कार्यवाही करण्याची मागणी जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून मागणी असलेले कबड्डी आणि पंगा हे वाण मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे, अशी मागणीही यावेळी आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. जिल्हाधिकारी यांनीही याची तात्काळ दखल घेतली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे म्हटले आहे.