बाळ विक्री करणाऱ्या टोळीतील सक्रिय सदस्य असलेल्या योगेंद्र आणि रिटा प्रजापती या निष्ठूर दाम्पत्याने आतापर्यंत स्वत:च्या पाच बाळांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास करणाऱ्या कळमना पोलिसांनाही धक्का बसला असून लगेच त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रातून तस्करी केलेल्या सर्वाधिक मुली देहव्यापारात ; ‘एनसीआरबी’ची आकडेवारी
व्यवसायाने परिचारिका असलेल्या श्वेता सावले ऊर्फ आयशा खान हिने नवजात बाळ विक्री करणारी टोळी तयार केली. राज्यभरात जाळे पसरवून नको असलेले बाळाचे पालक किंवा विक्री करण्याची तयारी दर्शवणाऱ्या पालकांना हेरण्याचे काम आयशाची टोळी करीत होती. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपुरात तिच्या टोळीचे सदस्य सक्रिय आहेत. रिटा प्रजापती आणि तिचा पती योगेंद्रसुद्धा तिच्या टोळीचे सदस्य असून आयशाच्या बाळ विक्रीच्या पापात सहभागी आहेत. स्वच्छंद स्वभावाच्या रिटाने आयशाच्या टोळीसाठी काम करणे सुरू केले. तिच्या टोळीतील दुसरा सदस्य राजस्थानच्या योगेंद्रशी रिटाची ओळख झाली. दोघांनीही काही बाळांचा सौदा करून आयशासोबत लाखोंची कमाई केली. पैशांच्या लालसेपोटी रिटा आणि योगेंद्रनेही स्वत:चे बाळ विक्री करण्याचा कट रचला. त्यामुळे रिटा आणि योगेंद्र यांनी नावासाठी प्रेमविवाह केला. दोघांनी बाळ विक्री करून पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या बाळाला जन्म दिला. ते बाळ विक्री करून ५ लाख रुपये मिळाले. त्यामुळे दोघांनाही पैसे कमावण्याची चटक लागली. त्यातून रिटा आणि योगेंद्रने स्वत:च्या पाच बाळांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कळमन्याचे ठाणेदार विनोद पाटील यांनी रिटाच्या भूतकाळ तपासत असून आतापर्यंत किती बाळांची विक्री केल्याची माहिती गोळा करीत आहेत. सध्या योगेंद्र, रिटा प्रजापती आणि आयशा खानला १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
हेही वाचा- नागपूर: पत्नीला फसविण्यासाठी बापाने मुलीला दिला गळफास
आयशा बालाघाटमध्ये तोतया डॉक्टर
श्वेता ऊर्फ आयशा खान हिचे मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये तीन मजली घर आहे. तिच्या घरीत तिने क्लिनिक सुरू केले आहे. आयशाने क्लिनिकच्या फलकावर डॉ. आयशा खान असा उल्लेख केला असून तिच्या क्लिनिकमध्ये रुग्ण तपासणी सुरू केली आहे. यासोबतच तिने बालाघाटमध्ये अन्य एका ठिकाणी रुग्णालय उघडले असून तिथेही काही तोतया डॉक्टर्स रोजंदारीने ठेवले आहेत. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झालेल्या तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे बाळ खरेदी करणे आणि बाळांची राज्यभरातील निपुत्रिक दाम्पत्यांना ५ ते १० लाखांत विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.