वर्धा: घरकुल लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून वाळू मिळालेली नाही. बांधकाम नसल्याने गवंडी बेरोजगार झाले. आता हातातील औजारांचे करायचे काय, म्हणून या कारागिरांनी चक्क आपले टोपले, फावडे, कुदळ, कवचा हे सामान शासन दारी विकायला नेले.
आर्वी उपविभागीय कार्यालय पुढे ते नेवून टाकण्यात आले. औजारे विकून आलेले पैसे शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे आंदोलक संघटना प्रहारचे नेते बाळा जगताप यांनी जाहीर केले. तसेच येत्या चार दिवसात निर्णय न घेतल्यास रोज दुपारी एक तास घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
हेही वाचा… ‘एक सही संतापाची’ मनसेचे आंदोलन
घरकुल लाभार्थी दोन महिन्यापासून वाळू ची वाट बघत आहे. मध्य प्रदेशातून येणारी वाळू महागडी असल्याने ती परवडत नाही. पाच लाभार्थ्यांनी मिळून ट्रॅक्टरने वाळू आणल्यास त्यासाठी परवानगी मिळत नाही. वाळू नाही म्हणून बांधकाम ठप्प. गवंडी, मजूर, घरकुल लाभार्थी असे सर्व त्रस्त असल्याने शासनाने जागे होण्याची गरज आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.